मुंबई मेट्रो 3: ३ महिन्यांनंतरही भुयारी मार्गिकेवर ‘नो नेटवर्क’! ACES कंपनीच्या मनमानीमुळे प्रवाशांचे हाल

आदित्य कदम
2 Min Read

मुंबई मेट्रो ३ (Aqua Line) सुरू झाल्यानंतर आता तीन महिने उलटले आहेत. तरीही भुयारी मार्गिकेवर प्रवाशांना नेटवर्कचा त्रास सतावत आहे. उद्घाटनाच्या वेळी लवकरात लवकर सर्व ठिकाणी नेटवर्क उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले गेले होते, पण ते अद्याप पूर्ण झालेले नाही.

वरळी ते कुलाबा दरम्यानच्या भुयारी मेट्रो स्थानकांवर अनेक प्रवाशांना ‘नो नेटवर्क’ची समस्या आढळत आहे. विशेषतः जिथे २० फूट खोल भुयारी मार्गिका आहे, तिथे मोबाईल फोनवर कॉल येत नाहीत किंवा डेटा कनेक्ट होत नाही. नववर्षाच्या सुरुवातीलाही प्रवाशांना ही समस्या भोगावी लागली आहे.

या समस्येचे मूळ कारण ACES इंडिया लिमिटेड नावाच्या कंपनीशी असलेला करार आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (MMRCL) ने नेटवर्क सुविधा उभारण्यासाठी या कंपनीची भागीदारी ठेवली आहे. मात्र, दूरसंचार सेवा प्रदाते आणि ACES यांच्यात आर्थिक मुद्द्यावर सहमती निर्माण होत नसल्याचे समजते.

दूरसंचार कंपन्यांचा आरोप आहे की, नेटवर्क उभारण्यासाठी ACES कंपनीकडून अवाजवी दर मागितले जात आहेत. कंपनीने भांडवली खर्च (Capex) म्हणून तब्बल ११८ कोटी रुपयांचा अंदाज दिला आहे. तर टेलिकॉम सेवा प्रदात्यांच्या मते हा खर्च फक्त ३० कोटी रुपयांपर्यंतच असावा.

याबद्दल अधिक माहिती मिळाल्यानुसार, सुरुवातीला प्रति स्टेशन १३ लाख रुपये मागितले जात होते. नंतर हा दर वाजून घेऊन प्रति स्टेशन ५.५ लाख रुपये करण्यात आला. दुसरीकडे, टेलिकॉम कंपन्यांच्या गणनेनुसार प्रति स्टेशन दरमहा ३९,००० रुपये खर्च आणि त्यावर १० टक्के व्यवस्थापन शुल्क देणे योग्य आहे. याच आर्थिक वादामुळे प्रवाशांना मोबाईल नेटवर्क मिळत नाही.

सध्या मेट्रो मार्गिकेच्या काही भागांत Vodafone Idea (Vi) आणि BSNL ची कनेक्टिव्हिटी उपलब्ध आहे. पण Jio आणि Airtel वापरकर्त्यांना संपूर्ण भुयारी मार्गिकेवर नेटवर्क मिळत नाही. Vi च्या मते, आरे ते आचार्य अत्रे चौक (वरळी) या भागापर्यंत सेवा उपलब्ध आहे, पण वरळी ते कफ परेड दरम्यान तक्रारी येत आहेत. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरही याच प्रकारची परिस्थिती आहे.

नेटवर्क नसल्यामुळे भुयारी मेट्रोत अनेक प्रवाशांना दैनंदिन खूप त्रास होत आहे. मेट्रो मध्ये प्रवास करताना किंवा स्थानकावर थांबताना मोबाईल वापरणे शक्य होत नाही. ही समस्या लवकर सोडावी लागण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *