महाराष्ट्रातील निवडणुकींचा जोम दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यातील अनेक ठिकाणी उमेदवारांनी प्रचाराचा शंख फुंकला आहे. तर दुसरीकडे प्रेमप्रकरण, पारिवारिक वाद आणि संपत्तीच्या आकारावरुन देखील चर्चा सुरू आहे. ताजे अपडेट्स वाचा.
पती-पत्नी एकाच प्रभागात, वेगवेगळ्या पक्षांतून लढा
नागपुरात एका सुशिक्षित प्राध्यापक महिलेने पतींची उमेदवारी दुसऱ्या पक्षातून दाखल झाल्याने तिने माहेरी जाणे पसंत केल्याची वार्ता चर्चेत आहे. तसेच चंद्रपुरात एकाच कुटुंबातील पती-पत्नी दोन वेगवेगळ्या पक्षांतून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. महाविकास आघाडीतील सरकार असले तरी घरात दोघे वेगवेगळ्या पक्षांसाठी झुरापणा करत आहेत. एमईएल प्रभाग क्रमांक ३ मधून काँग्रेसचे उमेदवार लोमेश उईके आहेत, तर त्यांच्या पत्नी बेबीताई उईके शरद पवार गटाच्या शहर अध्यक्ष म्हणून त्याच प्रभागातील दुसऱ्या वॉर्डमधून राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढत आहेत. दोघांचाही प्रचार जोरात चालू आहे. या बाबतीत कुटुंबावर काहीही परिणाम होणार नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
धाराशिवमध्ये महायुतीत वादाची ठिणगी
धाराशिव जिल्ह्यात महायुतीतील घटक पक्ष शिवसेना आणि भाजपमध्ये वादाची चिन्हे दिसू लागली आहेत. माजी मंत्री तानाजी सावंत यांनी भाजपाच्या आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्यावर टीका केल्यानंतर आता भाजप कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे दिसत आहे. सोशल मीडियावर तानाजी सावंत यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. “काय म्हणताय धाराशिव?” या टॅगलाईनखाली जुन्या वादग्रस्त वक्तव्यांचा आधार घेऊन टीकेची मोहीम उघडली आहे. काही पोस्टमध्ये त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे, तर काही पोस्टमध्ये थेट राजकीय आरोप केले जात आहेत. यामुळे धाराशिव जिल्ह्यात शिवसेना-भाजप यांच्यातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.
पुण्यात अजित पवारांचा रोड शो
आज पुण्यात अजित पवारांचा रोड शो होणार आहे. त्यांच्या उपस्थितीमध्ये गोखले नगर परिसरातून हा रोड शो सुरू होईल. तर दुसरीकडे संजय राऊतांनी भाजपावर हल्लाबोल काढला आहे. त्यांनी म्हटले, भाजप दुतोंडी गांडुळ आहे. सावरकरांना मानत नाहीत, तर अजित पवारांना दूर करा. या वादामुळे राजकीय उष्णता वाढली आहे.
विदर्भात थंडीची लाट
नागपुरात आजही थंडीची लाट सुरू आहे. आज सकाळी नागपुरात किमान तापमान ८.० अंश सेल्सियस नोंदवण्यात आले. तर गोंदिया जिल्ह्यात राज्यातील सर्वात कमी तापमान ७.६ अंश सेल्सियस नोंदवण्यात आले. सलग दुसऱ्या दिवशी गोंदियाचे तापमान राज्यात सर्वात कमी राहिले. विदर्भात थंडीची लाट आहे. यवतमाळ मध्ये ९.८ अंश सेल्सियस तापमान नोंदवण्यात आले. उत्तर भारतातील थंडीचा परिणाम विदर्भावर दिसत आहे. पुढील तीन दिवस थंडी कायम राहणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.
बाभळगाव बंद, चव्हाण यांच्या विधानावर भडक
रवींद्र चव्हाण यांच्या वादग्रस्त विधानानंतर आज बाभळगाव बंदची हाक दिली गेली आहे. सकाळपासून बाजारपेठा कडकडीत बंद आहेत. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या आठवणी लातूर शहरातून शंभर टक्के पुसल्या जातील, असे विधान केले होते. दरम्यान त्यांच्या या विधानानंतर लातूर बंदची हाक देण्यात आली आहे. विलासरावांचे मूळ गाव असणाऱ्या बाभळगाव मध्ये देखील सकाळपासून कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. यावेळी बाभळगाव मधील नागरिकांनी रवींद्र चव्हाण यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन करत तीव्र निषेध व्यक्त केला.
दहिलीत दुर्दैवी घटना, विहिरीत उडी देऊन पित्याने आत्महत्या
दहिली येथे अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. दोन वर्षाच्या चिमुकल्यासह पित्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. विक्रम सुरेश मर्शेटवार (वय ३०) आणि त्यांचा दोन वर्षांचा मुलगा शिवाजी विक्रम मर्शेटवार यांची मृत्यू झाली. राजेश दिसलवार यांच्या शेतातील विहिरीत उडी मारून त्यांनी आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.
कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसची तयारी
कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस कडून अंबाबाई चरणी जाहीरनाम्याचं पूजन करण्यात आले. भवानी मंडपात जय्यत तयारी करण्यात आली आहे. खासदार शाहू छत्रपती महाराज, काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील, आमदार जयंत आसगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेसच्या सर्व नगरसेवकांनी करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या दर्शन घेतले. यावेळी शाहू छत्रपती महाराज आणि सतेज पाटील यांनी जाहीरनामा अंबाबाई चरणी विधिवत पूजा करून अर्पण केलाय. यावेळी काँग्रेसचे सर्व उमेदवार उपस्थित होते.
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या दरात मोठी घसरण
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत पंधरा दिवसात कांदा दरात १ हजार रुपयांची मोठी घसरण झाली आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत कांद्याच्या दरात सुमारे ६०० रुपयांची तर मागील पंधरा दिवसांत तब्बल १ हजार रुपयांनी बाजारभाव खाली आला आहे. लासलगावसह देशांतर्गत विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये लाल कांद्याची मोठ्या प्रमाणावर आवक होत असल्याने दरांवर दबाव निर्माण झाला आहे. बांगलादेशातील हिंसाचारामुळे भारतातून होणारी कांदा निर्यात मर्यादित प्रमाणात सुरू आहे. अरब देशांमध्ये चीन आणि पाकिस्तानचा कांदा कमी दरात उपलब्ध होत असल्याने भारतीय कांद्याच्या निर्यातीवर परिणाम झाला आहे. या सर्व परिस्थितीचा फटका थेट कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसत असून, एकट्या नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना गेल्या पंधरा दिवसात जिल्ह्यातील बाजार समित्यात झालेल्या २० लाख क्विंटल आवक मागे अंदाजे १७५ ते २०० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. कांद्याला जास्तीतजास्त २२०० रुपये, कमीतकमी ७०० रुपये तर सरासरी १६२५ रुपये प्रति क्विंटल असा बाजारभाव मिळाला आहे. सतत कांद्याच्या बाजार भावात घसरण होत असल्याने भविष्यात उन्हाळ कांदया प्रमाणे या लाल कांद्याचे उत्पादन खर्चही निघणे कठीण होणार असल्याची भावना शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात असून, राज्य व केंद्र शासनाने तातडीने हस्तक्षेप करून जास्तीतजास्त कांदा परदेशात कसा निर्यात होईल यासाठी लक्ष देण्याची मागणी कांदा निर्यातदारांनी केली आहे.
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची निवडणुकीची ड्यूटी, गैरहजेरीमुळे गुन्हा
छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीसाठी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची ड्यूटी लावली अन् प्रशिक्षणाला गैरहजर राहिल्यामुळे थेट गुन्हा दाखल केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे धक्का बसलेल्या कर्मचाऱ्याने मनपा आयुक्तांना पत्र पाठवून, गुन्हा दाखल केल्याने बदनामी झाली आहे. माझ्या जिवाला काही धोका झाल्यास संबंधित यंत्रणा जबाबदार असेल, असा इशारा दिला आहे. आरोग्य उपसंचालक कार्यालयातील कर्मचारी मूलचंद आलासिंग राठोड हे ३१ जुलै २०२५ रोजी सेवानिवृत्त झाले. मात्र, महापालिका निवडणुकीसाठी आयोगाने त्यांची स्थिर सर्वेक्षण पथकात नियुक्ती केली.
निवडणुकीच्या काळात जीवघेण्या बनावट दारूची तस्करी
निवडणुकीच्या काळात धुळ्याहून जीवघेण्या बनावट दारूची तस्करी सुरू आहे. सहा जणांच्या टोळीने ही तस्करी सुरू केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने बनावट दारू विकणाऱ्या सहा तरुणांना अटक करत कैलासनगर, शहागंजमधील घरांतून दारूच्या १२४८ बाटल्या जप्त करण्यात आल्या. महानगरपालिका निवडणुकीत मोठ्या प्रमाणात दारूविक्री होते. कमी पैशात दारूविक्री करणारी टोळी सक्रिय झल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक अभिनव बालुरे यांना मिळाली होती. माहितीच्या आधारे बनावट दारू विक्री करणाऱ्या टोळीवर कारवाई करण्यात आली. टोळीकडील दारूच्या काही बाटल्या मिळवल्यानंतर त्यात अतिशय घातक अशी बनावट दारू असल्याचे निष्पन्न झाले.
लातूरमध्ये मुख्यमंत्रींची विजय संकल्प सभा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज लातूरमध्ये विजय संकल्प सभा होणार आहे. लातूर महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपाकडून लातूर महानगरपालिकेत मोठी ताकद लावण्यात येत आहे. आजच्या काही दिवसापासून लातूरमध्ये प्रदेशाध्यक्ष यांच्यासह अनेक भाजपच्या बडे नेत्यांची ये-जा वाढली आहे. आज लातूरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विजयी संकल्प सभा होणार आहे.
१० दिवसांत भाजपला सोडचिठ्ठी, नितीन भोसले शिवसेनेत
माजी आमदार नितीन भोसले यांनी १० दिवसांत भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश केला. ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेमध्ये इन्कमिंगला सुरुवात झाली आहे. भाजपकडून तिकीट मिळवण्यासाठी नितीन भोसले यांनी काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र ऐनवेळी तिकीट कापण्यात आल्यानं त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
नागपूरमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण?
नागपूर महापालिका निवडणुकीत सर्व उमेदवारांचे अरज दाखल झाले आहेत. प्रतिज्ञापत्रांमधून उमेदवारांची संपत्ती उघडकीस आली. प्रभाग क्रमांक १ मधील भाजप उमेदवार वीरेंद्र कुकरेजा सर्वाधिक श्रीमंत ठरले. कुकरेजांच्या कुटुंबाची एकूण मालमत्ता ₹ ९४ कोटी ९४ लाखांहून अधिक आहे. वार्षिक उत्पन्न ₹ ६ कोटींहून अधिक आहे. २०१७ मध्ये कुकरेजांची संपत्ती सुमारे ₹ १६ कोटी होती. नऊ वर्षांत तब्बल ₹ ७८ कोटींची वाढ झाली. कुकरेजांचे प्रतिस्पर्धी सुशील जग्ग्यासी एकूण मालमत्ता ₹ ३ कोटी १४ लाख आहे. महिला उमेदवारांमध्येही कोट्यधीशांची प्रभाग १० ‘क’ मधून वैशाली चोपडे आघाडीवर आहेत. वैशाली चोपडे यांच्या कुटुंबाची संपत्ती ₹ ५८ कोटी १३ लाख आहे. काँग्रेस उमेदवार सीमा डवरे यांच्या कुटुंबाची संपत्ती ₹ १ कोटी ३७ लाख आहे. प्रभाग २३ मधील राष्ट्रवादी (शरद पवार गट) दुनेश्वर पेठेंच्या संपत्तीत घट झाली. पेठेंची मालमत्ता ₹ १३.९१ कोटींवरून घसरून ₹ १२.४९ कोटींवर आली. पेठेंवर ₹ १.२४ कोटींचे कर्ज आहे. भाजप उमेदवार नरेंद्र बोरकरांची संपत्ती वाढली. नरेंद्र बोरकरांची संपत्ती ₹ २.४० कोटींवरून आता ₹ ५.१७ कोटींवर आली. मनपा निवडणुकीत विकासासोबतच उमेदवारांच्या संपत्तीचीही जोरदार चर्चा सुरू आहे.
अंबादास दानवे आणि डॉ. शिवाजी सुक्रे यांना निवडणूक आयोगाची नोटीस
छत्रपती संभाजीनगरमध्ये महापालिका निवडणुकीत ठाकरे शिवसेनेच्या उमेदवारांना उमेदवारी मागे घेण्यासाठी धमकीचे फोन केल्याचा माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी घाटी हॉस्पिटलचे डीन डॉक्टर शिवाजी सुक्रे यांच्यावर आरोप केला होता. या प्रकरणाची मुख्य निवडणूक अधिकारी जी. श्रीकांत यांनी गंभीर दखल घेत दानवे यांच्या तक्रारीबाबत पुरावे आणि कागदपत्र सादर करण्यासाठी, तर डॉ. शिवाजी सुक्रे यांना अंबादास दानवे यांनी केलेल्या आरोपावर खुलासा सादर करण्यासाठी नोटीस बजावली आहे.
पोलिस स्टेशन मधील आलिशान महिलांचे विश्रांती कक्ष पोलिस अधिकाऱ्यांच्या ताब्यात
राज्याच्या गृह विभागाने सर्व पोलीस स्टेशनमध्ये महिला पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी बांधलेले आलिशान महिला विश्रांती कक्ष पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी आपल्या उपयोगासाठी ताब्यात घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. स्थानिक बीड जमादार व पोलीस उपनिरीक्षक दर्जाचे अधिकारी महिला विश्रांती कक्षा मधून आपला कारभार चालवत आहेत. विशेष म्हणजे हिंगोली जिल्ह्यातील एक नव्हे तर चार ते पाच पोलीस स्टेशनमध्ये हा सगळा गंभीर प्रकार सुरू आहे.
काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष हिदायत पटेल यांचं उपचारादरम्यान निधन
काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष हिदायत पटेल यांचं उपचार दरम्यान दुखत निधन झाले. कालं दुपारी हिदायत पटेल यांच्यावर राजकीय वादातून जीवघेणा चाकू हल्ला झाला होता. रात्री उशिरा हल्ला करणाऱ्याला अखेर अटक झाली होती. हल्ला करणार्या तरुणाचं नाव उबेद पटेल असं आहे. उबेद पटेल हा २४ मे २०१९ मध्ये हत्या करण्यात आलेल्या मोहाळा गावातील भाजप कार्यकर्ते मतीन पटेल यांचा पुतण्या आहे. २०१९ मध्ये लोकसभेचा निकाल लागल्यानंतर हिदायत पटेल यांचं गाव असलेल्या मोहाळा गावात राजकीय वादातून भाजप कार्यकर्ते मतीन पटेल यांची हत्या झाली होती. या हत्या प्रकरणात हिदायत पटेल यांच्यासह १० आरोपी होते. काल दुपारच्या दोन वाजताच्या नमाजनंतर हिदायत पटेल मोहाळा गावातील मरकज मशिदीत नमाज पडून बाहेर येत असतांना उबेदने हिदायत पटेल यांच्यावर चाकू हल्ला करण्यात आलाय. पटेल यांच्या मानेवर आणि चेहऱ्यावर चाकूने वार करण्यात आले.
सांगलीत भाजपा उमेदवारांच्या प्रचारासाठी आमदार पत्नी आणि सून उतरल्या रस्त्यावर
सांगली महापालिका निवडणुकीत प्रचाराचा धडाका सुरू आहे. भाजपा उमेदवारांच्या प्रचारासाठी आमदारांच्या पत्नी आणि सून देखील रस्त्यावर उतरल्या आहेत. मिरजेच्या प्रभाग ७ मधील भाजपा उमेदवार बानू जमादार, गणेश माळी, दयानंद खोत आणि उज्वला कांबळे यांच्या प्रचारार्थ आमदार सुरेश खाडे यांच्या पत्नी सुमन खाडे आणि सून रसिका खाडे यांनी पदयात्रा काढत उमेदवारांसोबत नागरिकांच्या भेटीगाठी देखील घेतले आहेत. प्रभागात केलेल्या विकासाच्या मुद्दावर भाजपा उमेदवारांकडून निवडणूक लढवण्यात येत आहे.
प्रणिती शिंदे यांच्यावर पुन्हा सुजात आंबेडकरांची टीका
काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्यावर पुन्हा वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजाता आंबेडकर यांनी अमरावतीत टीका केली. अख्या सोलापूरला प्रणिती शिंदे यांनी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काय केलं होतं, सोलापूरच्या मध्यच्या सीटवर काय केलं ते सोलापूरला माहित आहे. एका मुसलमानाचा बळी देऊन शिवसेना उबाठाची सीट गमावून भाजपला सरळ सरळ मदत करण्यात आली असा खळबळजनक आरोप त्यांनी केला. प्रणिती शिंदे जसं बोलतात त्यावर मी काहीच बोलणार नाही. पण निवडणुका संपल्यावर त्या कुठे जातील हे जग बघून ठरवेल असा दावा त्यांनी केला. प्रणिती शिंदे ह्या काँग्रेस सोडून भाजपमध्ये जातील असा दावा सुजात आंबेडकर यांनी केला होता त्या दाव्यावर ते ठाम आहेत.