मकर संक्रांतीचा उत्साह आता दरवळू लागला आहे. या वेळी घरात पुरणपोळी बनवण्याची तयारी सुरू असते. बहुतेकांना पुरणपोळी बनवण्यासाठी वेळ लागतो, पण आज आम्ही तुम्हाला अगदी झटपट तयार होणारी ‘खव्याची’ पुरणपोळीची रेसिपी सांगणार आहोत. ही रेसिपी फॉलो केल्यास फक्त १५ मिनिटांत तयार होईल. घाईगडबडीतही चविष्ट पदार्थ तयार करता येतो.
पुरणपोळी बनवण्यासाठी सर्वप्रथम पुरण तयार करावे लागते. यासाठी एका पॅनमध्ये हरभरा डाळ, हळद आणि थोडे तेल घालून डाळ शिजवून घ्या. शिजवलेली डाळ पुरण यंत्रात बारीक करून घ्या. यात आवडीनुसार गूळ टाका आणि चांगली पेस्ट बनवा. पुरण जास्त बारीक होणार नाही याची काळजी घ्या.
आता या मिश्रणात वेलची, जायफळ पावडर आणि केशर घालून चांगले मिक्स करा. तुम्ही इच्छेनुसार ड्रायफ्रूट्सची पेस्ट देखील यात टाकू शकता. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं काम आहे खवाचे. खवा हाताने बारीक करून तुपात परतून घ्या. परतलेला खवा तयार केलेल्या पुरणपोळीच्या मिश्रणात चांगला मिक्स करा. यामुळे पोळी अतिशय मऊ आणि चविष्ट बनते.
कणिक मळण्यासाठी परातीत मैदा, मीठ, थोडे तेल आणि पाणी टाकून मऊसर कणिक मळून घ्या. ही कणिक १०-१५ मिनिटे बाजूला ठेवून द्या. नंतर कणिकेचे छोटे गोळे करून त्याची पारी लाटा आणि त्यात तयार केलेले गोड पुरण भरून चांगली पुरणपोळी लाटा.
पॅनमध्ये थोडे तूप टाकून त्यात पुरणपोळी दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्या. ही गरमागरम पुरणपोळी दूध किंवा तुपासोबत खाल्ल्यास खूप चव येते. हा पदार्थ फक्त १५ मिनिटांत तयार होतो आणि घरातील सर्वांनाच खूप आवडतो. मकर संक्रांतीच्या घाईगडबडीत ही ‘खव्याची’ पुरणपोळी एकदम उत्तम पर्याय ठरेल.