महाराष्ट्रात भाजपला २९ महापालिकांत स्पष्ट बहुमत; नांदेड आणि नवी मुंबईत ऐतिहासिक विजय

आदित्य कदम
3 Min Read

महाराष्ट्रातील २९ महापालिकांच्या निकालांत भारतीय जनता पक्षाला (भाजप) स्पष्ट बहुमत मिळाले आहे. विशेषतः नांदेड आणि नवी मुंबईत भाजपचा ऐतिहासिक विजय झाला आहे. नांदेड महापालिकेत इतिहासात पहिल्यांदा भाजपचा महापौर बसणार असून पक्षाने ८१ पैकी ४५ जागा जिंकल्या आहेत. यामुळे अशोक चव्हाण यांचे वर्चस्व कायम राहिले आहे. तर नवी मुंबई महानगरपालिकेतही भाजपला बहुमतात सत्ता मिळाली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण क्रिस्टल हाऊस येथे उपस्थित राहून नवनिवडून आलेल्या नगरसेवकांचे अभिनंदन करणार आहेत. या निकालांमुळे पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते उत्साहित आहेत.

इतर ठिकाणी युवा स्वाभिमान पक्षाने दणदणीत विजय मिळवला आहे. पक्षाचे संस्थापक अध्यक्ष रवी राणा यांच्या गंगा सावित्री निवासस्थाना समोर मोठा जल्लोष पाहायला मिळाला. पक्षाचे १६ नगरसेवक निवडून आले आहेत. अमरावती शहरातील नवसारी प्रभागात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत डवरे पराभूत झाले. येथे भाजपचे उमेदवार ऋषिकेश देशमुख (२७ वर्षे) २२०० मतांनी विजयी झाले. ऋषिकेश म्हणतात, “माझी निवडणूक लोकांनी हातात घेतली म्हणून माझा विजय झाला. अमरावती शहरातील विकास कामे मार्गी लावणार.”

खोपोली नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी भाजपचे विक्रम साबळे बिनविरोध निवडले आहेत. पहिल्यांदाच नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या साबळे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांच्या कुटुंबात राजकीय दरी निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यांचे पुतणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांनी जिल्हा परिषदेसाठी स्वतंत्र मोर्चेबांधणी सुरू केल्यामुळे बिनसल्याचे चित्र दिसत आहे.

रत्नागिरी तालुक्यातील निवडणूक कार्यक्रम अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी जीवन देसाई म्हणतात, “प्रशासकीय यंत्रणा ‘लोकशाहीच्या उत्सवा’साठी सज्ज झाली आहे.” येथे २७१ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. ‘सखी’ मतदान केंद्रे, दिव्यांगांसाठी स्वतंत्र केंद्रे उभारली जाणार आहेत. संवेदनशील ठिकाणी सीसीटीव्ही आणि वेबकास्टिंगद्वारे कडी नजर ठेवली जाईल. एकूण ७०७ कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची फौज तैनात केली आहे.

दहावीच्या परीक्षेसाठी प्रवेशपत्रे २० जानेवारीपासून ऑनलाईन उपलब्ध होणार आहेत. शाळांनी विद्यार्थ्यांना कोणतेही शुल्क न आकारता प्रिंट काढून देण्याच्या सूचना दिल्या आहेत. दहावीची परीक्षा २० फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत घेतली जाईल.

रायगडच्या खालापूर पोलिसांनी मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर ६४ लाख रुपयांचा गुटखा जप्त केला. ही कारवाई टोल नाक्याजवळ करण्यात आली. शेख रशीद रहेमान आणि गणेश वानखेडे अशा दोन आरोपींना अटक करण्यात आली. गुटख्याची चाचणी करण्यासाठी अन्न औषध प्रशासनाला पाचारण करण्यात आले आहे. कंटेनर आणि गुटखा मिळून १ कोटी ३ लाखांचा माल पोलिसांनी जप्त केला आहे.

धाराशिवच्या परंडा शहरातील बीअरबारमध्ये तुफान हाणामारी झाली. दारु उधार न दिल्याच्या रागातून दारुड्याकडुन हल्ला करण्यात आला. बीअरबारचे मॅनेजर जनार्धन चंदर भोये आणि मालक बत्तीनी गौड यांवर लाकडी काठी आणि कॅरेटने हल्ला झाला. दोघे जखमी झाले. संपूर्ण घटना सिसिटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. परंडा पोलिसात विश्वास उर्फ बापु अंकुश भानवसे, रोहीत विश्वास भानवसे, महेश मच्छिंद्र भानवसे आणि अशोक मच्छिंद्र भानवसे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *