भारताने युरेशियन यूनियनमधून सोने आणि चांदीची आयात बदलली. अमेरिकेकडून थेट आणि मोठ्या प्रमाणावर खरेदी करण्याचा फायदा मिळाला. यामुळे देशांतर्गत किमती घटण्याची शक्यता आहे. भारताने ऊर्जा क्षेत्रासाठी अमेरिकेकडून तेल आणि नैसर्गिक वायूची खरेदी वाढवल्यानंतर, आता मौल्यवान धातूंच्या आयातीतही मोठा बदल करण्याचे संकेत दिले आहेत. भारत अमेरिकेला मोठ्या प्रमाणावर कृषी उत्पादने विकतो, पण त्या तुलनेत आयात कमी करतो. अमेरिकेकडून सोने खरेदी केल्यास दोन्ही देशांमधील व्यापाराचा समतोल राखला जाईल. जीपीयू सर्व्हरवरील आयात शुल्कात मोठी कपात करण्यात आली आहे. यामुळे भारतात डेटा सेंटर उभारण्याचा खर्च १४ टक्क्यांनी कमी होणार असून तंत्रज्ञान क्षेत्राला मोठी चालना मिळेल. भारतीय उत्पादनांना अमेरिकन बाजारपेठेत मोठी सवलत मिळणार आहे. सुमारे ३०.९४ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीवरील शुल्क ५० टक्क्यांवरून थेट १८ टक्क्यांपर्यंत खाली आणले आहे. भारताच्या १०.०३ अब्ज डॉलर्स किमतीच्या विविध उत्पादनांना अमेरिकेत एकही रुपया शुल्क न भरता प्रवेश मिळेल. याचा मोठा फायदा भारतीय निर्यातदारांना होईल. या करारामुळे कापड उद्योग, चर्मोद्योग, हिरे-दागिने, औषध निर्मिती आणि मशिनरी बनवणाऱ्या कंपन्यांना अमेरिकेत मोठा नफा कमावता येईल. अमेरिकेकडून आयात करताना भारताने आपल्या अटी कायम ठेवल्या आहेत. भारतात जीएम अन्नाला परवानगी नसेल आणि सर्व कृषी उत्पादनांना जैव-सुरक्षेचे कडक नियम पाळावे लागतील.