Maharashtra HSC Result 2026: बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. महाराष्ट्र बोर्डाने बारावीच्या निकालाची तारीख आणि वेळ अधिकृतपणे जाहीर केली आहे. त्यानुसार २ मे रोजी सकाळी ११ वाजता निकाल घोषित केला जाणार आहे. मागील काही दिवसांपासून निकालाची प्रतीक्षा करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांचा अखेर उद्या प्रतीक्षेचा अंत होणार आहे.
राज्यातील पुणे, मुंबई, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागांमध्ये बारावीची परीक्षा पार पडली होती. यंदा राज्यभरातून सुमारे १४ लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे.
निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना तो ऑनलाइन पद्धतीने पाहता येणार आहे. mahresult.nic.in, hscresult.mkcl.org आणि mahahsscboard.in या अधिकृत वेबसाइटवर निकाल उपलब्ध होईल. वेबसाइटवर जाऊन विद्यार्थ्यांना त्यांचा सीट नंबर किंवा रोल नंबर टाकावा लागेल. त्यानंतर आईचे पहिले नाव भरून ‘View Result’ या पर्यायावर क्लिक केल्यास निकाल स्क्रीनवर दिसेल.
निकाल पाहिल्यानंतर विद्यार्थी त्याचा स्क्रीनशॉट घेऊ शकतात किंवा प्रिंटआऊटही काढू शकतात. ऑनलाइन गुणपत्रिका मोबाईलवरूनही सहज पाहता येणार आहे. याशिवाय डिजीलॉकर ॲपच्या माध्यमातूनही निकालपत्र डाउनलोड करण्याची सुविधा उपलब्ध असणार आहे.
निकालानंतर एखाद्या विद्यार्थ्याला गुणांबाबत शंका असल्यास किंवा उत्तरपत्रिकेची पडताळणी करायची असल्यास त्यासाठी ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. यासाठी ३ मे ते १७ मे हा कालावधी देण्यात आला आहे. संबंधित प्रक्रियेबाबतची माहिती बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध होणार आहे.
बारावीचा निकाल पाहताना वेबसाइटवर जास्त ट्रॅफिक असल्यामुळे काही वेळा साइट मंदावू शकते. अशावेळी घाई न करता काही वेळाने पुन्हा प्रयत्न करावा, असा सल्ला विद्यार्थ्यांना दिला जात आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.