Krushi Mitra Jojana सुरू होणार; 11,587 कृषी मित्रांची होणार नियुक्ती

आदित्य कदम
2 Min Read

राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता प्रत्येक गावात कृषी मित्र नेमण्याची योजना राबवली जाणार असून यामुळे ग्रामीण भागातील तरुणांना रोजगाराची नवी संधी उपलब्ध होणार आहे.

पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी या योजनेची माहिती दिली. शेतकऱ्यांना शेतीविषयक योग्य मार्गदर्शन वेळेवर मिळावे, सरकारी योजनांची माहिती गावपातळीपर्यंत पोहोचावी आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढावा, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यात आधीच कृषी विभागाकडून 11 हजार 587 कृषी पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यासोबतच आता आत्मा योजनेअंतर्गत गावागावात शेतकरी मित्र नेमले जाणार आहेत. प्रत्येक सहाय्यक कृषी अधिकाऱ्यासोबत हे कृषी मित्र काम करतील.

या योजनेत निवड झालेल्या कृषी मित्रांना 18 हजार रुपये मानधन दिले जाणार आहे. हे मानधन दर तीन महिन्यांनी टप्प्याटप्प्याने दिले जाईल. सरकारचा हा उपक्रम 1 जूनपासून सुरू करण्याचा विचार आहे.

या पदासाठी काही अटीही निश्चित करण्यात येणार आहेत. नवीन तंत्रज्ञान स्वीकारणारा, शेतीचा अनुभव असलेला आणि शेतकऱ्यांशी चांगला संवाद साधू शकणाऱ्या व्यक्तींना प्राधान्य दिले जाणार आहे. तसेच समाजकार्याची आवड, सोशल मीडियाचा वापर आणि किमान माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक शिक्षण आवश्यक असणार आहे.

महिलांनाही या योजनेत मोठी संधी मिळणार आहे. नियुक्ती प्रक्रियेत 30 टक्के महिलांना प्राधान्य दिले जाणार असून अर्जदाराचे वय 40 वर्षांपेक्षा कमी असणे अपेक्षित आहे.

पहिल्या टप्प्यात राज्यभरात 11,587 कृषी मित्रांची नियुक्ती केली जाणार असून ही प्रक्रिया जिल्हास्तरावर राबवली जाणार असल्याचेही भरणे यांनी स्पष्ट केले.

ही योजना सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांना गावातच शेतीविषयक मार्गदर्शन मिळेल, सरकारी योजनांची माहिती सहज मिळेल आणि ग्रामीण युवकांसाठी रोजगाराचे नवे दार उघडेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Related Posts

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *