लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसीमुळे ग्रामीण महिलांना त्रास; वेबसाइट डाऊन असल्याने पायपीट

किरण गावडे
2 Min Read

Ladki Bahin Yojana: महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसीमुळे ग्रामीण भागातील महिला लाभार्थींना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. योजनेची वेबसाइट वारंवार डाऊन होत असल्याने त्यांची नोंदणी प्रक्रिया अडकून पडली आहे. यामुळे शासनाच्या या महत्त्वाकांक्षी योजनेचा लाभ घेण्यासाठी येणाऱ्या महिलांना वारंवार सायबर कॅफेच्या चक्करात पडावे लागते.

राज्य सरकारने ऐन निवडणुकीपूर्वी सुरू केलेल्या या योजनेसाठी ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली होती. पण आता हीच प्रक्रिया ग्रामीण महिलांसाठी डोकेदुखी ठरत आहे. वेबसाइटवर होणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे अनेक पात्र महिला योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी महिलांना अनेक तास सायबर कॅफेमध्ये वाट पाहावी लागते. लाडकी बहीण योजनेची वेबसाइट वारंवार हँग होते आणि सर्वर डाऊन असतो. यामुळे नोंदणी पूर्ण होत नाही. ग्रामीण भागातील महिला दूरदूरहून केंद्रांवर येतात, पण तांत्रिक अडचणींमुळे निराश होऊन परत जावे लागते.

यामुळे लाभार्थी महिलांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या त्रासातून मुक्तता मिळावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. वेबसाइट तात्काळ सुरळीत करावी, अशी मागणीही केली जात आहे.

बोगस अर्ज रोखण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली होती. यामुळे लाभार्थ्यांच्या कागदपत्रांची अचूक छाननी होणार होती. पण सध्याच्या तांत्रिक अडचणीमुळे हे पाऊल खऱ्या पात्र महिलांसाठीच अडथळा ठरत आहे. कागदपत्रे सादर करूनही तांत्रिक बिघाडामुळे प्रक्रियेत अडकून पडल्याने महिला हवालदिल झाल्या आहेत.

नंदुरबार जिल्ह्यातील अनेक महिलांनी स्थानिक प्रशासनाकडे मागणी केली आहे की योजनेचा लाभ लवकर मिळावा यासाठी तांत्रिक अडचणी दूर व्हाव्यात. शासनाने या समस्येकडे त्वरित लक्ष देऊन ई-केवायसीची वेबसाइट सुरळीत कार्यरत करण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी केली जात आहे. जेणेकरून गरजू महिलांना सरकारी योजनेचा लाभ विनाअडथळा मिळेल आणि त्यांची होणारी पायपीट थांबेल.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *