Aryan Singh
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे मालिका नुकतीच संपली. या तीन सामन्यांच्या मालिकेत भारताला पराभव पत्करावा लागला. मात्र, या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. आपला महत्त्वाचा खेळाडू श्रेयस अय्यर मैदानातून बाहेर गेला आहे.
श्रेयस अय्यरला क्षेत्ररक्षण करताना ही दुखापत झाली. ऑस्ट्रेलियाचा फलंदाज अॅलेक्स कॅरीचा कॅच घेताना त्याला दुखापत झाली. त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता त्याच्या दुखापतीबद्दल महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
तिसरा वनडे सामना शनिवारी खेळला गेला. हर्षित राणा गोलंदाजी करत होता. त्याचवेळी अॅलेक्स कॅरीचा झेल घेताना श्रेयस अय्यरच्या डाव्या बरगडीला मार लागला. या दुखापतीमुळे तो किमान तीन आठवडे क्रिकेट खेळू शकणार नाही.
बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने पीटीआयला श्रेयस अय्यर दुखापत अपडेट्सबद्दल माहिती दिली. ते म्हणाले, “सामन्यादरम्यान श्रेयसला स्कॅनसाठी रुग्णालयात नेण्यात आले होते. त्याच्या बरगडीला फ्रॅक्चर झाले आहे. त्याला आता किमान तीन आठवडे विश्रांती घ्यावी लागेल.”
तीन आठवड्यांनंतर तो सेंटर ऑफ एक्सलन्स येथे रिपोर्ट करेल. त्यानंतर पुढील चाचण्या होतील. गरज पडल्यास त्याला आणखी विश्रांती घ्यावी लागू शकते, असेही अधिकाऱ्याने सांगितले.
आता क्रिकेटप्रेमींच्या मनात एकच प्रश्न आहे की अय्यर मैदानात कधी परतणार? मिळालेल्या माहितीनुसार, श्रेयस अय्यर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी तयार होऊ शकतो. ३० नोव्हेंबरला रांचीमध्ये पहिला वनडे सामना आहे. पण याबद्दल अजून कोणतीही अधिकृत पुष्टी नाही.
सूत्रांच्या माहितीनुसार मात्र, अय्यर कधी परतणार हे सांगणे कठीण आहे. जर त्याला सावरण्यासाठी चार आठवडे लागले, तर त्याचे मैदानात येणे लांबेल.
दुखापत नेमकी कशी झाली, हे पाहूया. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यात अॅलेक्स कॅरीने मारलेला बॉल थर्ड मॅनकडे गेला. अय्यर बॅकवर्ड पॉइंटवर उभा होता. त्याने शानदार झेल घेतला, पण तो जमिनीवर आदळला. याचवेळी त्याच्या बरगडीला दुखापत झाली.
यानंतर संघाचे फिजिओ कमलेश जैन लगेच मैदानावर आले आणि त्यांनी अय्यरला घेऊन मैदानातून बाहेर गेले. त्यानंतर त्याला दवाखान्यात नेण्यात आले होते. आता तो लवकर बरा होऊन मैदानात कधी परततो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.