Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या योजनेतून 92 लाख महिलांना वगळल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी याबाबत सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे.
अदिती तटकरे यांनी सांगितले की, ऑगस्ट 2025 पासून योजनेसाठी ई-केवायसी प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. महिलांना ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत देण्यात आली होती. त्यानंतर त्रुटी दुरुस्त करण्यासाठी एप्रिलपर्यंत अतिरिक्त वेळही देण्यात आला होता. तरीही अनेक लाभार्थींनी आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली नसल्याने त्यांना योजनेतून वगळण्यात आले.
ज्या महिलांनी ई-केवायसी पूर्ण केली आहे, पण त्यांना अद्याप योजनेचा लाभ मिळालेला नाही, अशा प्रकरणांची प्रशासनाकडून पडताळणी सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली.
सरकारने दिलेल्या माहितीनुसार, सुमारे 60 लाख महिलांनी मुदत संपेपर्यंत ई-केवायसी पूर्ण केली नाही. त्यामुळे त्यांची नावे लाभार्थी यादीतून वगळण्यात आली.
याशिवाय आयकर विभागाच्या पडताळणीत सुमारे 5 लाख महिला करदाते कुटुंबातील असल्याचे समोर आले. तसेच ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, अशा सुमारे 14 ते 15 लाख महिलाही योजनेसाठी अपात्र ठरल्या.
कुटुंबाच्या नावावर चारचाकी वाहन असल्याचा निकष लागू झाल्यामुळे आणखी साडेचार ते पाच लाख महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले.
दरम्यान, बीड जिल्ह्यात 28 लाख महिला अपात्र ठरल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू होती. मात्र हा दावा चुकीचा असून त्यामध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले.
महत्त्वाचे: 92 लाख महिलांना वगळल्याबाबत विविध कारणांची एकत्रित आकडेवारी समोर आली असली, तरी अंतिम अधिकृत लाभार्थी यादी आणि विभागनिहाय तपशील सरकारकडून वेळोवेळी अद्ययावत केला जात आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.