ऐतिहासिक! मराठी चित्रपट ‘दशावतार’ आता मल्याळी भाषेत केरळमध्ये होणार रिलीज; मराठी सिनेसृष्टीची मोठी भरारी

आदित्य कदम
2 Min Read


ऐतिहासिक यश मिळवलेल्या मराठी चित्रपटाने आता केरळमध्येही आपला ठसा उमटवण्याची तयारी केली आहे. सुबोध खानोलकर लिखित व दिग्दर्शित ‘दशावतार’ हा चित्रपट आता मल्याळी भाषेत प्रदर्शित होणार आहे.झी स्टुडियोज प्रस्तुत आणि ओशन फिल्म कंपनी व ओशन आर्ट हाऊस निर्मित हा चित्रपट १२ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला होता. तेव्हापासून या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.

‘दशावतार’ने मराठी प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. चित्रपटाला ५० आठवडे पूर्ण होत असतानाच आता तो दुसऱ्या भाषेत प्रदर्शित होणे, हे मराठी सिनेसृष्टीसाठी मोठी गोष्ट आहे. केवळ महाराष्ट्रातच नाही, तर बडोदा, इंदूर, हैदराबाद, बंगळूरु आणि दिल्ली अशा अनेक शहरांमध्ये ‘दशावतार’ हाऊसफुल चालला आहे.

एवढेच नाही, तर अमेरिकेपासून ऑस्ट्रेलिया, जपान, युएई आणि जर्मनीपर्यंत अनेक देशांमध्ये या चित्रपटाने धूम केली आहे. मराठी भाषेच्या सीमा ओलांडून अमराठी प्रेक्षकांनीही याचे कौतुक केले. यामुळे इतर भाषिक प्रेक्षकांमध्येही या चित्रपटाबद्दल उत्सुकता वाढली.

याच कुतूहलामुळे केरळमधील प्रेक्षकांच्या मागणीवरून ‘दशावतार’ आता मल्याळीमध्ये रिलीज होत आहे. दर्जेदार चित्रपटांसाठी ओळखल्या जाणाऱ्या मल्याळी चित्रपटसृष्टीत हा चित्रपट दाखल होणार आहे. मॅक्स मार्केटिंगचे वरुण गुप्ता ही संस्था हा चित्रपट केरळमध्ये वितरीत करत आहे. नुकतेच या चित्रपटाचे मल्याळी भाषेतील पोस्टरही प्रदर्शित झाले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ नोव्हेंबर रोजी ‘दशावतार’ केरळमध्ये प्रदर्शित होईल. मराठी चित्रपट मल्याळी भाषेत प्रदर्शित होण्याची ही बहुधा पहिलीच वेळ आहे. उत्तम कथा आणि सादरीकरणाच्या जोरावर मराठी चित्रपट मोठी झेप घेऊ शकतो, हे ‘दशावतार’ने दाखवून दिले आहे. दशावतार मल्याळी रिलीज हा मराठी मनोरंजनासाठी नक्कीच अभिमानास्पद क्षण आहे.


Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *