मोहम्मद शमी फिटनेसमुळे टीम इंडियातून बाहेर? मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांनी स्पष्ट केले कारण

आदित्य कदम
2 Min Read


टीम इंडियातून मोहम्मद शमीला वगळल्यामुळे क्रिकेट वर्तुळात बरीच चर्चा रंगली. विशेषतः ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी जेव्हा संघ निवडला गेला, तेव्हा अनेकजण चकित झाले, कारण शमी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळला होता. त्यामुळे त्याच्या जागेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले. आता मुख्य निवडकते अजित आगरकर यांनी यावर मोठे भाष्य केले आहे, ज्यामुळे मोहम्मद शमी अजित आगरकर यांच्या भूमिकेबद्दल असलेली उत्सुकता कमी झाली आहे.

रणजी ट्रॉफीमध्ये बंगालकडून खेळताना मोहम्मद शमीने शानदार कामगिरी करत आपण पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचे दाखवून दिले होते. याआधी इंग्लंड आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेतूनही त्याला वगळण्यात आले होते. त्यामुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून वगळल्याने अनेकांना आश्चर्य वाटले.

शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील भारताच्या संघाची घोषणा करताना अजित आगरकर यांनी 2027 च्या वनडे वर्ल्डकपसाठी संघाची बांधणी सुरू असल्याचे सांगितले होते. मात्र, त्यावेळी शमीला संघात स्थान का मिळाले नाही, यावर त्यांनी अधिक भाष्य केले नव्हते. यानंतर मोहम्मद शमीने निवड समितीवर नाराजी व्यक्त केली होती. त्याचे म्हणणे होते की, रणजीसाठी मी फिट आहे, तर 50 षटकांचे क्रिकेटही खेळू शकतो.

आता अजित आगरकर यांनी या मुद्द्यावर स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी एका मुलाखतीत सांगितले की, “जर शमी इथे असता, तर मी त्याला थेट उत्तर दिले असते. तो फिट असेल, तर आपल्याकडे शमीसारखा गोलंदाज का नाही? मी त्याच्याशी अनेक वेळा बोललो आहे. गेल्या सहा ते आठ महिन्यांमध्ये आम्हाला असे जाणवले आहे की तो पूर्णपणे फिट नाही.”

आगरकर पुढे म्हणाले, “तो इंग्लंड दौऱ्यासाठी निवड होण्याइतका तंदुरुस्त नव्हता. त्याने मला जर सांगितले असते की तो फिट आहे, तर मी त्याला नक्कीच उत्तर दिले असते. सोशल मीडियावर त्याने काय विधान केले, हे मला नेमके माहीत नाही. कदाचित त्याचे ते विधान पाहिल्यावर मी त्याला फोन करेन.”

मोहम्मद शमीने यापूर्वी प्रतिक्रिया देताना म्हटले होते की, “अपडेट देणे किंवा अपडेट मागणे ही माझी जबाबदारी नाही. माझे काम एनसीएमध्ये जाऊन तयारी करणे आणि सामने खेळणे आहे.” यामुळे मोहम्मद शमी आणि निवड समितीतील संवाद कधी न कधी कमी पडल्याचे दिसून येते.


Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *