मुंबई: ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस इंडियाने (Oxford University Press) आता खासदार उदयनराजे भोसले यांची जाहीर माफी मागितली आहे. ही माफी २००३ साली प्रकाशित झालेल्या ‘शिवाजी: हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया’ (Shivaji: Hindu King in Islamic India) या पुस्तकातील वादग्रस्त मजकुरासाठी मागितली गेली आहे.
या पुस्तकातील काही टप्प्यांवर छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अतिशय खोलकरुण व अपमानजक विधाने प्रकाशित करण्यात आल्याचे ऑक्सफर्डने मान्य केले आहे. विशेषतः पान क्रमांक ३१, ३३, ३४ आणि ९३ वरील मजकुरामुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्याचे स्वीकारत प्रकाशन संस्थेने खेद व्यक्त केला आहे. प्रकाशन संस्थेने त्यांच्या जाहीर नोटिसमध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे की, या विधानांना प्रकाशित केल्याबद्दल त्यांना मनापासून वाईट वाटते आणि यासाठी ते खासदार उदयनराजे भोसले यांच्याकडून तसेच सामान्य जनतेकडून क्षमा मागतात.
हा मुद्दा आता चर्चेत आला आहे. शिवप्रेमी आणि इतिहास अभ्यासकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. त्यांचं म्हणणं आहे की, इतिहासातील महान व्यक्तिमत्त्वांविषयी लेखन करताना अधिक जबाबदारी घेणे गरजेचे आहे. असं केलं तरच अचूक आणि संशोधनाधारित माहिती जनतेपर्यंत पोहोचू शकते, अशी मागणी आता जोर पकडत आहे.