पुणे: गजा मारणे टोळीतील मुख्य सदस्य असलेल्या रूपेश मारणे याला अखेर अटक करण्यात यश आले आहे. कोथरूड पोलिसांनी त्याला मुळशी तालुक्यातील आंदगाव येथील एका बंगल्यातून मंगळवारी (२८ ऑक्टोबर) पहाटे अटक केली. रूपेश मारणे गेल्या नऊ महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देत होता.
आयटी अभियंता देवेंद्र जोग यांना शिवजयंतीच्या दिवशी मारहाण केल्याप्रकरणी गजा मारणे टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. या हल्ल्यात गजानन मारणेसह इतर अनेकांना अटक झाली होती. मात्र, रूपेश मारणे तेव्हापासून फरार होता. कोथरूड पोलीस आणि गुन्हे शाखेचे पथक त्याचा कसून शोध घेत होते.
रूपेश मारणे मुळशी तालुक्यातील आंदगावमध्ये एका मोठ्या बंगल्यात लपला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीनंतर पोलीस पथकाने पहाटे बंगल्याला वेढा घातला. रूपेश पळून जाऊ नये म्हणून सर्व बाजूंनी पोलीस अधिकारी तैनात होते. पोलिसांनी दरवाजा वाजवताच एका महिलेने दार उघडले आणि पोलिसांनी आत प्रवेश करून रूपेश मारणेला ताब्यात घेतले.
रूपेश मारणे हा गजा मारणे टोळीतील महत्त्वाचा सदस्य मानला जातो. त्याच्यावर यापूर्वी खुनाचा प्रयत्न आणि व्यावसायिकाचे अपहरण करणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. तीन वर्षांपूर्वी एका व्यावसायिकाचे अपहरण करून चार कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी गजा मारणे आणि रूपेश मारणेसह १५ जणांवर मोक्का कारवाई झाली होती. त्यावेळीही रूपेश बराच काळ फरार होता. विशेष म्हणजे, तेव्हाही त्याला मुळशी तालुक्यातूनच अटक करण्यात आली होती.
रूपेश आंदगावमध्ये येणार असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचला. पहाटे साडेचारच्या सुमारास त्याला पकडण्यात यश आले. या कारवाईमुळे रूपेश मारणे अटक पुणे प्रकरणातील एक महत्त्वाचा आरोपी पोलिसांच्या हाती लागला आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत.