अभिनेते सचिन पिळगांवकर गेली अनेक महिने सोशल मीडियावर होणाऱ्या ट्रोलिंगमुळे चर्चेत होते. त्यांनी केलेल्या काही वक्तव्यांमुळे त्यांना प्रचंड ट्रोल करण्यात आलं. या सगळ्या टीका आणि ट्रोलिंगवर अनेक महिन्यांनी चुप्पी साधलेल्या सचिनांनी आखेर मौन सोडलं आहे. त्यांनी ट्रोलर्सना थेट उत्तर देत मनातलं सांगितलं आहे.
सचिन पिळगांवकर अनेक महिन्यांनंतर टेलिव्हिजनवर दिसणार आहेत. ‘मी होणार सुपरस्टार छोटे उत्साद’ या कार्यक्रमाच्या नव्या पर्वात ते परिक्षक असणार आहेत. यानिमित्तानं दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ट्रोलिंगवर आपले मत व्यक्त केलं.
सचिन म्हणाले, “मुळात, ट्रोल करणाऱ्यांना तुम्ही केलेलं काम माहिती नसेल तर त्यांना बोलण्यात काही अर्थ नाही. करिअरच्या 62 व्या वर्षी मी त्यांना इतका महत्त्वाचा वाटत असेन, लोकप्रिय असेन तर आजवर मी जे काही कमावलं, ती परमेश्वराची कृपा आहे.”
त्यांनी पुढे म्हटले, “कदाचित ट्रोलर्सना मी त्यांचा वयाचा वाटतो म्हणून ते टीका करतात. माझ्यावर प्रेम करणाऱ्यांची संख्या किती मोठी आहे याची मला जाणीव आहे. मी काम करत राहणार. टीकाकारांनो तुमचं भलं व्हावं, असा आशीर्वाद देईन.”
सचिन यांच्या या वक्तव्यांआधी त्यांची मुलगी अभिनेत्री श्रिया पिळगांवकर आणि पत्नी सुप्रिया पिळगांवकर यांनीही ट्रोलर्सना उत्तर दिलं होतं. त्यांनी सांगितलं होतं की ट्रोलिंगचा त्यांच्यावर काही फरक पडत नाही. सचिनांच्या या वागणुकीबद्दल सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी त्यांची बाजू घेतली आहे.