महाराष्ट्राचे मुख्यमंत्री २०४७ पर्यंत एनडीए–भाजप महायुतीचेच असतील, आणि ते मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरच कार्यरत राहतील. असा दावा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.
नागपुरमध्ये पत्रकारांशी बोलताना बावनकुळे म्हणाले, “संजय राऊत यांनी २०४७ पर्यंत मंत्रालयात बसायचे स्वप्न पाहूच नये.” त्यांनी स्पष्ट केले की, ठाकरे शिवसेनेने एकवेळ भाजपसोबत जाऊ पण शिंदे गटासोबत जाणार नाही, अशी भूमिका घेतली असताना हे वक्तव्य केले गेले आहे.
भारतीय जनता पक्षाच्या जागा काही प्रमाणात कमी झाल्या असल्या तरी आमचाच सर्वात मोठा पक्ष आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. “जागा का कमी झाल्या याचे चिंतन आणि तपास करण्याची पालकमंत्री म्हणून माझी जबाबदारी आहे,” बावनकुळे म्हणाले.
अमरावती महापौर पदासाठी भाजप बहुमत साधेल अशी त्यांनी ग्वाही दिली. महापौर निवडीसाठी सर्व पक्षांशी चर्चा केली जाईल आणि भाजपला कसे बहुमत मिळेल याचा निर्णय घेतला जाईल, असेही ते म्हणाले. “ज्यांना भाजपच्या महापौराला पाठिंबा द्यायचा आहे, त्यांचे स्वागत आहे. विकासासाठी सर्वांनी एकत्र यावे,” अशी विनंती त्यांनी केली.
जर अमरावतीचा महापौर भाजपचा झाला तर केंद्र आणि राज्य सरकारकडून शहराला मोठ्या प्रमाणात निधी मिळण्याचा विश्वास त्यांनी दिला. या निवडीचा निर्णय राज्याचा पार्लमेंटरी बोर्ड, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि कोअर कमिटी घेईल, असेही बावनकुळे सांगितले.
महायुतीतील जे पक्ष भाजपसोबत येतील त्यांना सोबत घेतले जाईल, असा निर्देशही त्यांनी दिला. राष्ट्रवादी आमदार संजय खोडके यांच्या संदर्भात ते बोलत होते. बिहार भवनच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, विविध समाजांसाठी राज्यांमध्ये भवन उभारण्यात काहीही गैर नाही आणि समाज भवन उभारणीला कोणीही विरोध करू नये.