बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती, उद्योगपती राज कुंद्रा, सध्या त्यांच्या कायदेशीर अडचणींमुळे चर्चेत आहेत. एका मोठ्या फसवणुकीच्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने दोघांनाही मोठा धक्का दिला आहे. राज कुंद्रावर तब्बल ६० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. याच प्रकरणात आता कोर्टाने शिल्पा शेट्टीला परदेशात जाण्यास स्पष्ट नकार दिला आहे.
या प्रकरणात, कोर्टाने दोघांनाही ही रक्कम न्यायालयात जमा करेपर्यंत परदेशात जाण्याची परवानगी नाकारली आहे. या निर्णयामुळे शिल्पा शेट्टी सध्या मोठ्या धर्मसंकटात सापडली आहे. आता झालेल्या सुनावणीत हायकोर्टाने शिल्पाला दिलासा देण्यास नकार दिला आहे, ज्यामुळे तिची अडचण वाढली आहे.
शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी कोर्टात वेगळी बाजू मांडली. त्यांनी सांगितले की, तिचा तिच्या पतीच्या, म्हणजेच राज कुंद्राच्या कंपनीशी कोणताही थेट संबंध नाही. त्यामुळे तिच्याविरोधात जारी करण्यात आलेली ‘लूक आऊट नोटीस’ रद्द करावी, अशी मागणी वकिलांनी केली.
या मागणीवर कोर्टाने एक महत्त्वाचा पर्याय समोर ठेवला. कोर्ट म्हणाली, “जर तुम्हाला परदेशात जायचे असेल, तर आधी माफीचा साक्षीदार बना. तुमचे पती राज कुंद्रा यांच्याकडून हे लेखी प्रतिज्ञापत्रावर दाखल करा.” कोर्टाने १६ ऑक्टोबरपर्यंत हे लेखी पुरावे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
ईओडब्ल्यूने (आर्थिक गुन्हे शाखा) शिल्पाविरोधात जी लूक आऊट नोटीस जारी केली आहे, त्यामुळे तिच्या अडचणी वाढल्या असल्याचे दिसत आहे. हे प्रकरण नेमके काय आहे, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.
लोटस कॅपिटल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडचे संचालक दीपक कोठारी यांनी शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. कोठारी यांच्या तक्रारीनुसार, सुमारे एक दशकापूर्वी राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांनी त्यांच्याकडून ६० कोटी रुपये घेतले होते. या पैशातून आपला व्यवसाय वाढवण्याचे आश्वासन या जोडप्याने दिले होते आणि त्यासाठी दोन हप्त्यांमध्ये हे पैसे देण्यात आले.
कोठारी यांचा आरोप आहे की, पैसे घेतल्यानंतर या दोघांनी व्यवसाय वाढवण्यात कोणतीही मदत केली नाही. उलट, सर्व पैसे त्यांनी स्वतःच्या वैयक्तिक वापरासाठी खर्च केले. तक्रारीत असे नमूद केले आहे की, २०१५ मध्ये शिल्पा आणि राज कुंद्रा यांनी एका मध्यस्थामार्फत संपर्क साधला होता. त्यावेळी बेस्ट डील टीव्ही प्रायव्हेट लिमिटेडसाठी ७५ कोटी रुपयांच्या कर्जावर चर्चा झाली होती.
हे कर्ज लाइफस्टाइल उत्पादने आणि एका ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्मसाठी घेण्यात आले होते. या कर्जावर १२ टक्के व्याज निश्चित करण्यात आले होते. पैसे वेळेवर न मिळाल्याने ऑगस्ट २०२५ मध्ये कोठारी यांनी तक्रार नोंदवली. त्यानंतर लगेच सप्टेंबर महिन्यात त्यांच्याविरोधात लूकआउट नोटीस देखील जारी करण्यात आली.