टीम इंडियाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर याला सिडनीमध्ये यशस्वीरित्या शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान त्याला दुखापत झाली होती. झेल घेताना पडल्यामुळे त्याच्या बरगड्यांच्या खाली गंभीर दुखापत झाली होती. तपासणीनंतर त्याच्या स्प्लीनमधून (प्लीहा) हलका रक्तस्राव होत असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले.
यामुळे श्रेयस अय्यरला तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागले आणि त्याला आयसीयूमध्ये (ICU) ठेवण्यात आले होते. आता एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. श्रेयस अय्यरच्या स्प्लीनला झालेल्या जखमेवर सिडनीतील डॉक्टरांनी यशस्वी शस्त्रक्रिया पूर्ण केली आहे.
क्रिकबझच्या माहितीनुसार, शस्त्रक्रियेनंतर श्रेयस अय्यरची प्रकृती आता स्थिर आहे. त्याला आयसीयू वॉर्डमधून जनरल वॉर्डमध्ये हलवण्यात आले आहे. शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यामुळे क्रीडाप्रेमींनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रेयस अय्यरला सिडनीच्या रुग्णालयात आणखी किमान पाच ते सात दिवस राहावे लागणार आहे. डॉक्टरांनी त्याला एक आठवडा पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे तो लवकरच फ्रेश होऊन भारतात परतण्याची शक्यता आहे. बीसीसीआयची वैद्यकीय टीम त्याच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.
या दुखापतीमुळे श्रेयस अय्यरला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेला मुकावे लागणार आहे. ही मालिका ३० नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. अय्यरला मैदानात परतण्यासाठी आणखी सहा आठवड्यांचा कालावधी लागू शकतो.
दरम्यान, कर्णधार सूर्यकुमार यादवने अय्यरच्या तब्येतीबद्दल माहिती दिली आहे. त्याने सांगितले की, “मी आत्ताच अय्यरशी बोललो आहे. तो आता चांगला आहे आणि पुढील काही दिवस डॉक्टरांच्या देखरेखीखाली राहील. डिस्चार्ज मिळाल्यावर आम्ही त्याला सोबत घेऊन भारतात परत येऊ.” श्रेयस अय्यर दुखापत शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याने चाहत्यांना दिलासा मिळाला आहे.