मुंबई लोकलच्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी! पश्चिम रेल्वेने उपनगरीय रेल्वेच्या सुरक्षेसाठी मोठा निर्णय घेतला आहे. ३७ स्थानकांवर एकूण २०० सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत. यामागे अलीकडे वाढलेल्या गुन्हेगारी प्रसंग आणि तिकीट वादांची पार्श्वभूमी आहे.
गेल्या महिन्यात भरदिवसा प्राध्यापकावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर रेल्वे सुरक्षेच्या कमतरतेवर चर्चा सुरू झाल्या होत्या. याचबरोबर तिकीट न काढता प्रवास करणे, टिकट तपास अधिकाऱ्यांबरोबरचे वाद यांसारख्या घटनांना देखील आळा घालण्यासाठी ही कार्यवाही केली जात आहे.
रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की २५.८१ कोटी रुपये खर्चून हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. यातील सीसीटीव्ही कॅमेरे प्रामुख्याने तीन प्रमुख ठिकाणी लावले जातील – तिकीट कार्यालये, बुकिंग काउंटर आणि टीटी/टीसी अधिकाऱ्यांची कार्यालये. यामुळे कर्मचाऱ्यांना सुरक्षिततेची भावना निर्माण होईल.
प्रवासी आरक्षण प्रणाली (PRS) केंद्रांवर २९ ठिकाणी तर UTS काउंटरवर ६८ ठिकाणी कॅमेरे बसवले जाणार आहेत. त्याचबरोबर टिकिट तपास अधिकाऱ्यांच्या खोल्यांमध्येही सुरक्षा व्यवस्था अधिक चांगली होईल. विशेषत: रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ही व्यवस्था फायद्याची ठरेल.
रेल्वे प्रशासनाचे म्हणणे आहे की या योजनेमुळे गर्दीच्या वेळी होणाऱ्या गैरवर्तनांवर लगेच नियंत्रण मिळेल. प्रवाशांच्या सुरक्षिततेसोबतच तिकीट तपासणी प्रक्रियेच्या पारदर्शकतेतही सुधारणा होईल.