मुंबई-गोवा महामार्गावर पुन्हा टोल वसुली? मेपासून ओसरगाव नाका सुरू होण्याची शक्यता

आदित्य कदम
2 Min Read

सिंधुदुर्गात पुन्हा एकदा टोल वसुलीचा मुद्दा चर्चेत आला आहे. मुंबई-गोवा महामार्गावर ओसरगाव टोल नाका सुरू करण्याच्या हालचाली वेगाने सुरू झाल्या आहेत. मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून वसुली सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) यासाठी निविदा मागवल्या आहेत. २४ एप्रिल रोजी या निविदा उघडल्या जाणार असून त्यानंतर ठेकेदार निश्चित केला जाईल.

ओसरगाव टोल नाक्यावरून जानवली पूल ते पत्रादेवी या सुमारे ६० किलोमीटर मार्गासाठी टोल आकारला जाणार आहे. यापूर्वी जून २०२३ मध्ये येथे टोल सुरू करण्यात आला होता. मात्र, स्थानिकांच्या तीव्र आंदोलनानंतर तो बंद करण्यात आला होता. आता पुन्हा एकदा टोल वसुली सुरू करण्याची तयारी दिसत आहे.

सरकारच्या अंदाजानुसार या नाक्यावरून दरवर्षी सुमारे ५७ कोटी रुपयांचा महसूल मिळू शकतो.

दरांबाबत पाहिले तर कार, जीप आणि व्हॅनसाठी एकेरी प्रवासासाठी १२५ रुपये मोजावे लागतील. परतीसाठी १९० रुपये आकारले जातील. स्थानिक वाहनांसाठी सवलतीचा दर ६५ रुपये ठेवण्यात आला आहे. मिनी बस आणि हलक्या व्यावसायिक वाहनांसाठी २०० रुपये, बस आणि ट्रकसाठी ४२५ रुपये, तर अवजड वाहनांसाठी ६६५ रुपये दर निश्चित करण्यात आले आहेत.

मात्र, स्थानिक वाहनांना पूर्ण सवलत देण्याबाबत कोणतीही स्पष्ट तरतूद नाही. त्यामुळे स्थानिक नागरिकांवर आर्थिक भार वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, या निर्णयावरून राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. माजी आमदार वैभव नाईक यांनी यावर टीका केली आहे. त्यांच्या मते, महामार्गाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. अशा स्थितीत टोल सुरू करणे योग्य नाही.

महामार्ग पूर्ण होण्यासाठी अजून वेळ लागणार असल्याचे सांगत त्यांनी टोल वसुलीला विरोध दर्शवला आहे. त्यामुळे येत्या काळात या मुद्द्यावरून पुन्हा आंदोलनाची शक्यता नाकारता येत नाही.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Related Posts

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *