अनेकांच्या मोबाईलवर अचानक ‘Emergency Alert’ असा मेसेज झळकला किंवा जोरात बीपसारखा सायरन वाजला. त्यामुळे अनेकजण घाबरले, काहींना फोनमध्ये बिघाड झाला की काय अशीही शंका आली. मात्र यात घाबरण्यासारखं काहीही नाही.
केंद्र सरकार आणि NDMA (राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण) सध्या देशभरात नव्या आपत्कालीन सूचना प्रणालीची चाचणी करत आहेत. या प्रणालीला Cell Broadcast System असं म्हटलं जातं. या माध्यमातून एखाद्या ठराविक भागातील सर्व मोबाईलवर एकाच वेळी इशारा किंवा सूचना पाठवता येते.
ही प्रणाली ‘सचेत’ या अलर्ट प्लॅटफॉर्मशी जोडलेली आहे. स्वदेशी तंत्रज्ञानाच्या मदतीने ती विकसित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे एखाद्या भागात भूकंप, त्सुनामी, वीज पडणे, गॅस गळती किंवा इतर मोठी आपत्ती आली, तर काही सेकंदांत त्या परिसरातील लोकांपर्यंत सूचना पोहोचवण्याची क्षमता या प्रणालीमध्ये आहे.
या अलर्टचा आणखी एक फायदा म्हणजे मोबाईल नेटवर्कवर जास्त ताण पडत नाही. सामान्य एसएमएसप्रमाणे एकेक मेसेज न पाठवता, एकाच वेळी हजारो-लाखो मोबाईलवर संदेश पाठवला जातो. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत माहिती जलद पोहोचू शकते.
सध्या सुरू असलेले संदेश हे फक्त चाचणी संदेश आहेत. सरकारने स्पष्ट केलं आहे की, हे मेसेज आल्यावर नागरिकांनी कोणतीही कृती करण्याची गरज नाही. काहींना हे अलर्ट एकापेक्षा जास्त वेळा मिळू शकतात. कारण वेगवेगळ्या मोबाईल टॉवर्सची तपासणी सुरू आहे.
ज्या मोबाईलमध्ये टेस्ट अलर्टचं सेटिंग सुरू आहे, त्यांनाच हे संदेश मिळतात. फोनच्या सेटिंग्जमध्ये जाऊन Wireless Emergency Alerts किंवा Test Alerts या पर्यायातून हे सेटिंग तपासता येऊ शकतं.
थोडक्यात, मोबाईलवर Emergency Alert मेसेज आला तर घाबरू नका. ही देशातील आपत्ती व्यवस्थापन अधिक मजबूत करण्यासाठी सुरू असलेली सरकारी चाचणी आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.