Mahila Bachat Gat: महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार विविध योजना राबवत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून महिला बचत गटांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. बचत गट स्थापन करणाऱ्या महिलांना सुरुवातीला 60 हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य मिळणार असून, त्यानंतर कमी व्याजदरात कर्जाची सुविधाही उपलब्ध होणार आहे.
यंदाच्या वर्षात बचत गटांना मोठ्या प्रमाणावर बँक कर्ज उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे. त्याअंतर्गत एकट्या सोलापूर जिल्ह्यातील महिला बचत गटांसाठी सुमारे 615 कोटी रुपयांचे कर्ज वितरित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्रात सध्या 2.5 लाखांहून अधिक बचत गट कार्यरत आहेत. या गटांमधून 2 कोटींपेक्षा जास्त महिला जोडल्या गेल्या आहेत. सोलापूर जिल्ह्यात ‘उमेद’ आणि महिला आर्थिक विकास महामंडळ (MAVIM) यांच्या माध्यमातून सुमारे 25 हजार बचत गट कार्यरत आहेत.
याशिवाय, प्रशासनाने आणखी 17 हजार नवीन बचत गट स्थापन करण्याचे नियोजन केले आहे. या उपक्रमामुळे सुमारे 1.75 लाख महिलांना रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.
बचत गट स्थापन करण्यासाठी किमान 10 महिलांचा गट असणे आवश्यक आहे. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर केंद्र सरकारकडून 30 हजार रुपये आणि राज्य सरकारकडून 30 हजार रुपये, असे मिळून 60 हजार रुपयांचे खेळते भांडवल दिले जाते.
महत्त्वाची बाब म्हणजे ही रक्कम परत करण्याची गरज नसते. बचत गटाचे दैनंदिन कामकाज आणि आर्थिक व्यवहार सुरळीत चालवण्यासाठी या निधीचा वापर करता येतो.
गटाला सहा महिने पूर्ण झाल्यानंतर सुरुवातीला 60 हजार रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते. गटाची आर्थिक कामगिरी चांगली असल्यास ही कर्जमर्यादा पुढे 1.5 लाख रुपयांपर्यंत वाढवली जाऊ शकते.
‘उमेद’ आणि महिला आर्थिक विकास महामंडळाच्या सहकार्याने बँकांकडूनही महिलांना कर्ज दिले जाणार आहे. 3 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर 7 टक्के व्याजदर आकारला जाईल. तर 3 लाख रुपयांपेक्षा जास्त कर्जासाठी 12 टक्क्यांपर्यंत व्याजदर लागू होईल.
या आर्थिक मदतीमुळे महिला लघुउद्योग, गृहउद्योग, शेतीपूरक व्यवसाय आणि इतर स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी आवश्यक भांडवल सहज उभे करू शकतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.