Ladki Bahin Yojana: अंतिम पडताळणीनंतर मोठा बदल; 1.66 कोटी महिला पात्र

आदित्य कदम
2 Min Read

Ladki Bahin Yojana Final List: राज्य सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ अंतर्गत लाभार्थी महिलांची अंतिम पडताळणी आणि e-KYC प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या प्रक्रियेनंतर राज्यातील पात्र महिलांची अंतिम संख्या 1 कोटी 66 लाख 28 हजार 48 इतकी निश्चित करण्यात आली आहे. जून महिन्याचा हप्ता या सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला आहे.

योजना सुरू झाल्यानंतर राज्यभरातून सुमारे 2 कोटी 47 लाख अर्ज प्राप्त झाले होते. मात्र, कागदपत्रांची आणि अर्जांची सविस्तर तपासणी केल्यानंतर 80 लाखांहून अधिक अर्ज अपात्र ठरले आहेत.

पडताळणीदरम्यान सुमारे 24 लाख महिलांनी चुकून स्वतःची नोंद ‘शासकीय कर्मचारी’ अशी केली होती. त्यामुळे त्या सुरुवातीला अपात्र ठरल्या. त्यानंतर सरकारने ही चूक दुरुस्त करण्यासाठी चार महिन्यांची मुदत दिली.

या कालावधीत 24 लाखांपैकी सुमारे 20 लाख महिलांनी आपली माहिती दुरुस्त केली. त्यामुळे त्या पुन्हा योजनेसाठी पात्र ठरल्या. तर सुमारे 4 लाख महिला पात्रतेच्या निकषात बसत नसल्याने अपात्र राहिल्या.

पडताळणी पूर्ण झाल्यानंतर सरकारच्या खर्चातही मोठी बचत होणार आहे. यापूर्वी या योजनेसाठी दरवर्षी सुमारे 36 हजार कोटी रुपयांची तरतूद करावी लागत होती. आता लाभार्थ्यांची संख्या निश्चित झाल्यानंतर सरकारचा मासिक खर्च सुमारे 2,459 कोटी रुपये राहणार असून, वर्षाला जवळपास 12 हजार कोटी रुपयांची बचत होण्याचा अंदाज आहे.

सरकारने योजनेतील लाभार्थ्यांची तपासणी पुढेही नियमितपणे सुरू ठेवण्याचे स्पष्ट केले आहे. नियमांनुसार 65 वर्षे वय पूर्ण झाल्यानंतर संबंधित महिलांचा लाभ आपोआप बंद होईल.

महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले की, पडताळणीमुळे योजना अधिक पारदर्शक झाली आहे. तसेच अपात्र लाभार्थ्यांच्या आकडेवारीबाबत चुकीची माहिती पसरवली जात असल्याचाही त्यांनी दावा केला.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Related Posts

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *