लाडकी बहीण योजनेवर सरकारचा 78,700 कोटींचा खर्च; पात्र लाभार्थी नेमके किती?

आदित्य कदम
2 Min Read

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै 2024 पासून महाराष्ट्रात सुरू आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. आता या योजनेवरील आतापर्यंतच्या खर्चाची आणि लाभार्थ्यांची आकडेवारी समोर आली आहे.

महाराष्ट्र सरकारने जुलै 2024 ते जुलै 2026 या कालावधीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी तब्बल 78,700 कोटी रुपये खर्च केल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या योजनेच्या आकडेवारीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. सरकारने योजनेबाबत खरी आणि स्पष्ट आकडेवारी जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

लाडकी बहीण योजनेबाबत श्वेतपत्रिका तातडीने प्रसिद्ध करावी. तसेच सुमारे 5000 कोटी रुपयांच्या कथित अपात्र वितरणाची निष्पक्ष चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

डिसेंबर 2024 मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची संख्या 2 कोटी 46 लाख होती. मात्र, जुलै 2026 पर्यंत ही संख्या कमी होऊन 1 कोटी 64 लाख इतकी झाली आहे.

ऑगस्ट 2025 पासून सरकारने योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ई-केवायसी प्रक्रिया सुरू केली. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी देण्यात आला होता. ई-केवायसी पूर्ण न झाल्याने तसेच इतर कारणांमुळे अनेक महिलांची नावे लाभार्थी यादीतून कमी करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न केल्यामुळे लाभार्थी यादीतून सुमारे 62 लाख महिलांची नावे कमी झाली आहेत.

त्यामुळे डिसेंबर 2024 मधील 2 कोटी 46 लाख लाभार्थ्यांच्या तुलनेत आता पात्र लाभार्थ्यांची संख्या 1 कोटी 64 लाखांवर आली आहे. ई-केवायसी न करणे आणि इतर पात्रता निकषांमध्ये अपात्र ठरणे ही यामागची कारणे असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, आता सर्वांचे लक्ष ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याकडे लागले आहे. पात्र महिलांच्या खात्यात 1500 रुपयांचा हा हप्ता सरकारकडून कधी जमा केला जाणार, याची प्रतीक्षा आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Related Posts

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *