मच्छिमारांसाठी मोठी खुशखबर! नेटवर्क नसतानाही करता येणार संपर्क

आदित्य कदम
2 Min Read

Satellite Phones for Maharashtra: महाराष्ट्रातील खोल समुद्रात मासेमारी करणाऱ्या मच्छिमारांसाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत आता मच्छिमारांना BSNL चे सॅटेलाइट फोन उपलब्ध करून दिले जाणार आहेत. त्यामुळे मोबाईल नेटवर्क नसलेल्या समुद्रातील भागातही संपर्क साधणे शक्य होणार आहे.

मत्स्यव्यवसाय विभाग आणि BSNL यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवला जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मंत्रालयात या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात पाच मच्छिमारांना सॅटेलाइट फोनचे वितरण करण्यात आले.

या सॅटेलाइट फोनच्या मदतीने इनकमिंग आणि आउटगोइंग कॉल दोन्ही सुविधा उपलब्ध असतील. त्यामुळे खोल समुद्रात असतानाही किनाऱ्याशी सातत्याने संपर्क ठेवणे शक्य होणार आहे.

मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले की, मच्छिमारांचे जीव आणि उपजीविका सुरक्षित ठेवणे हे सरकारचे प्राधान्य आहे. समुद्रात मोबाईल नेटवर्क नसल्यामुळे अनेक अडचणी निर्माण होतात. अशा वेळी सॅटेलाइट फोन ही सुविधा मच्छिमारांसाठी मोठा आधार ठरणार आहे.

या सुविधेमुळे खराब हवामान, बोटीत यांत्रिक बिघाड, वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती किंवा इतर संकटाच्या वेळी तातडीने मदत मागवता येणार आहे. तसेच नेटवर्क नसलेल्या भागातही संपर्क कायम राहणार असल्याने बचावकार्य अधिक वेगाने करता येईल.

सॅटेलाइट फोनमुळे मत्स्य नौका आणि किनाऱ्यावरील नियंत्रण कक्ष यांच्यात सातत्यपूर्ण संपर्क राहील. हवामानातील बदल, समुद्री इशारे आणि सुरक्षा सूचना मच्छिमारांपर्यंत वेळेत पोहोचवता येतील. त्यामुळे समुद्रातील अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.

राज्य सरकार ‘मच्छिमार सुरक्षा प्रथम’ या धोरणांतर्गत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवत आहे. सॅटेलाइट फोनच्या या सुविधेमुळे राज्यातील मत्स्यव्यवसाय अधिक सुरक्षित, आधुनिक आणि तंत्रज्ञानाधारित करण्याच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Related Posts

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *