‘मनाचे श्लोक’ सिनेमा थिएटरमध्ये बंद पाडणे पडले महागात; हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल

आदित्य कदम
2 Min Read


मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री आणि दिग्दर्शिका मृण्मयी देशपांडे यांचा ‘मनाचे श्लोक’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून चर्चेत आहे. या चित्रपटाला काही हिंदुत्ववादी संघटनांकडून विरोध होत आहे. याच विरोधातून पुण्यात नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत. पुण्यातील एका चित्रपटगृहात जाऊन काही कार्यकर्त्यांनी थेट थिएटरमध्ये गोंधळ घालत ‘मनाचे श्लोक’ सिनेमाचा शो बंद पाडला.

हे कृत्य आता त्यांना चांगलेच महागात पडल्याचे दिसत आहे. पुण्यातील अलंकार पोलीस ठाण्यात हिंदुत्ववादी कार्यकर्त्या उज्वला गौड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‘मनाचे श्लोक’ चित्रपट बंद पाडल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर शनिवारी पुण्यातील अभिरुची थिएटरमध्ये ‘मनाचे श्लोक’चा शो सुरु होता. यावेळी उज्वला गौड काही कार्यकर्त्यांसह थिएटरमध्ये घुसल्या. त्यांनी थिएटरमध्ये गोंधळ घालून, चित्रपट चालू असतानाच शो थांबवला. थिएटरमध्ये गोंधळ घालतानाचे त्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या कृत्यानंतर त्यांच्यावर टीका झाली.

पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणणे आणि थिएटरमध्ये गैरवर्तन करणे या आरोपांखाली उज्वला गौड यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ‘मनाचे श्लोक’ सिनेमा वादामुळे हा सिनेमा चर्चेत आहे.

यापूर्वी देखील या चित्रपटाला विरोध झाला होता. समर्थ रामदास स्वामी महाराजांनी रचलेल्या ‘मनाचे श्लोक’ या पवित्र ग्रंथाच्या नावाचा वापर चित्रपटासाठी केल्याने हा वाद सुरू झाला. हिंदू जनजागृती समितीने याला तीव्र विरोध दर्शवला आहे. त्यांनी हा हिंदूंच्या श्रद्धेचा ‘बाजार मांडण्यासारखा प्रकार’ असल्याचा आरोप केला होता.

यापूर्वी पुण्यातील कोथरूड येथील सिटी प्राईड चित्रपटगृहातही काही कार्यकर्त्यांनी थेट शो मध्ये गोंधळ घालून शो बंद पाडला होता. आता पुन्हा एकदा शो बंद पाडणे पोलिसांच्या कारवाईस कारणीभूत ठरले आहे.

या सर्व घडामोडीनंतर अभिनेत्री मृण्मयी देशपांडे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *