पुण्यात राजकारण तापलं: समीर पाटलांनी रवींद्र धंगेकरांवर ठोकला ५० कोटींचा मानहानीचा दावा; ‘MCOCA’ आरोपांवरून वाद शिगेला

किरण गावडे
2 Min Read


पुण्यात राजकारण तापलं: समीर पाटलांनी रवींद्र धंगेकरांवर ठोकला ५० कोटींचा मानहानीचा दावा; ‘MCOCA’ आरोपांवरून वाद शिगेला

पुणे शहरात राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. शिवसेना (शिंदे गट) नेते रवींद्र धंगेकर यांनी भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांचे निकटवर्तीय समीर पाटील यांच्यावर काही गंभीर आरोप केले होते. याच आरोपांमुळे आता समीर पाटील यांनी पत्रकार परिषद घेत धंगेकरांना मोठा धक्का दिला आहे.

समीर पाटील यांनी रवींद्र धंगेकरांविरोधात तब्बल ५० कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केला आहे. पुण्यातील गुंड निलेश घायवळ देशामध्ये फरार झाल्याच्या पार्श्वभूमीवर धंगेकर यांनी ही टीका केली होती. या टीकेमध्ये त्यांनी थेट समीर पाटील यांच्यावर मोक्का संबंधित गंभीर आरोप केले होते.

धंगेकरांनी केलेले आरोप खोटे असून, माझ्याविरोधात कोणतेही पुरावे नाहीत, असे समीर पाटील यांनी म्हटले आहे. पत्रकार परिषदेत बोलताना पाटील म्हणाले की, गेल्या आठ दिवसांपासून माझे नाव घेऊन आरोप केले जात आहेत. पण त्यांनी अद्याप कोणताही पुरावा सादर केलेला नाही.

धंगेकरांनी असा दावा केला होता की मी मोक्का (MCOCA) अंतर्गत गुन्हेगार आहे. यावर बोलताना पाटील यांनी स्पष्ट केले की, मी कोणताही गुन्हेगार नाही. आरोप करण्याआधी पुरावे जमा करायचे असतात, हे धंगेकरांना कळायला हवे.

समीर पाटील यांनी पत्रकार परिषदेत एक व्हिडिओ देखील दाखवला. त्यामध्ये सागर गवसणे नावाच्या व्यक्तीचा उल्लेख होता. पाटील म्हणाले की, हा इसम कोणत्या पक्षाचा आहे, हे आपल्याला माहीत नाही, पण त्याच्यावर विविध ठिकाणी अनेक गुन्हे दाखल आहेत. मी या इसमाला ओळखत नाही आणि मी कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याला फोन केलेला नाही, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.

मी पूर्णपणे स्वच्छ असल्याचे सांगत, पाटील यांनी कोथरुडच्या जनतेला आता ठरवावे लागेल की कोण गुन्हेगारांना पाठीशी घालत आहे, असा सवाल केला. रवींद्र धंगेकरांनी माझ्यावर असलेल्या गुन्ह्यांबद्दल बोलावे, पण मी स्वच्छ आहे, असे ते म्हणाले.

या सर्व आरोपांमुळे माझी बदनामी झाली आहे. त्यामुळे माझ्या वकिलांमार्फत रवींद्र धंगेकरांना नोटीस पाठवली असून, ५० कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला आहे, अशी माहिती समीर पाटील यांनी दिली आहे. या प्रकरणात आता समोर काय घडते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *