दादर, शिवाजी पार्क परिसरात 1 मे रोजी वाहतूक निर्बंध; बाहेर पडण्यापूर्वी जाणून घ्या मार्ग

आदित्य कदम
2 Min Read

महाराष्ट्र दिनानिमित्त 1 मे रोजी दादरमधील शिवाजी पार्क येथे विशेष परेडचे आयोजन करण्यात आले आहे. यामुळे दादर आणि आसपासच्या परिसरातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले आहेत. याबाबत मुंबई वाहतूक पोलिसांनी अधिसूचना जारी केली असून, सकाळी 6 ते दुपारी 12 या वेळेत हे बदल लागू असणार आहेत.

या कालावधीत काही महत्त्वाच्या रस्त्यांवर वाहतुकीस बंदी असेल, तर काही मार्गांवर एकेरी वाहतूक सुरू ठेवण्यात येणार आहे. दक्षिण आणि उत्तर केळूस्कर मार्गावर वाहतुकीवर निर्बंध असतील. तसेच एस. के. बोले रोड आणि स्वातंत्रवीर सावरकर मार्गावरील वाहतुकीतही बदल करण्यात आले आहेत.

दक्षिण मुंबई, पश्चिम उपनगर आणि दादरकडे जाणाऱ्या वाहनचालकांसाठी पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. त्यामुळे प्रवासापूर्वी मार्गाची माहिती घेऊनच बाहेर पडण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

याशिवाय, केळूस्कर मार्ग, पांडुरंग नाईक मार्ग आणि एन. सी. केळकर मार्गाच्या काही भागात नो-पार्किंग लागू करण्यात आले आहे. त्यामुळे वाहनचालकांनी या ठिकाणी वाहन उभे करू नये, अन्यथा कारवाई होऊ शकते.

सरकारी विभागांच्या वाहनांसाठी स्वातंत्रवीर सावरकर स्मारक, वनिता समाज सभागृह, महात्मा गांधी जलतरण तलाव आणि कोहिनूर सार्वजनिक वाहनतळ येथे पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.

परेडसाठी येणाऱ्या आमंत्रितांसाठी वेगवेगळे प्रवेशमार्ग निश्चित करण्यात आले आहेत. दक्षिण मुंबई, पश्चिम उपनगर आणि टिळक उड्डाणपूल मार्गे येणाऱ्यांसाठी स्वतंत्र मार्ग आखण्यात आले असून, वाहतूक पोलिस ठिकठिकाणी मार्गदर्शनासाठी तैनात असतील.

परेड संचलनादरम्यान शिवाजी पार्क परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शक्य असल्यास नागरिकांनी सकाळी 6 ते दुपारी 12 या वेळेत हा परिसर टाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

तसेच, विनाकारपास येणाऱ्या नागरिकांसाठी वाहन पार्किंगची सुविधा दादर पश्चिम येथील कोहिनूर सार्वजनिक वाहनतळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Related Posts

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *