PM Kisan Yojana: सरकारकडून शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या जातात. यापैकी प्रधानमंत्री किसान मानधन योजना (PM-KMY) ही शेतकऱ्यांना वृद्धापकाळात आर्थिक आधार देणारी पेन्शन योजना आहे. या योजनेला सात वर्षे पूर्ण झाली असून, देशभरातील सुमारे 25 लाख शेतकरी या योजनेशी जोडले गेले आहेत.
या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर दरमहा किमान ₹3,000 पेन्शन मिळते. या योजनेची आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे शेतकरी पेन्शन फंडात जेवढे योगदान देतो, तेवढेच योगदान केंद्र सरकारकडूनही दिले जाते.
या योजनेत 18 ते 40 वर्षे वयोगटातील शेतकरी सहभागी होऊ शकतात. सहभागी झाल्यानंतर वयाच्या 60 वर्षांपर्यंत नियमित योगदान द्यावे लागते. शेतकरी ज्या वयात योजनेत सहभागी होतो, त्यानुसार मासिक योगदानाची रक्कम ठरते.
18 वर्षांच्या शेतकऱ्याला दरमहा ₹55, 20 वर्षांच्या शेतकऱ्याला ₹61, 25 वर्षांच्या शेतकऱ्याला ₹80, 30 वर्षांच्या शेतकऱ्याला ₹105, तर 40 वर्षांच्या शेतकऱ्याला ₹200 मासिक योगदान द्यावे लागते.
या योजनेचा लाभ 2 हेक्टरपर्यंत शेतीयोग्य जमीन असलेल्या लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना मिळू शकतो. संबंधित राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाच्या जमीन नोंदीमध्ये शेतकऱ्याचे नाव असणे आवश्यक आहे.
अर्जासाठी आधार कार्ड, बँक खाते आणि मोबाइल क्रमांकाची आवश्यकता असते. मात्र, NPS, EPFO किंवा ESIC अंतर्गत येणारे तसेच आयकर भरणारे शेतकरी या योजनेसाठी पात्र नसतात.
योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकरी जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) मध्ये जाऊ शकतात. यासाठी आधार कार्ड, बँक पासबुक किंवा कॅन्सल चेक आणि जमिनीची कागदपत्रे सोबत घेऊन जावी लागतात.
CSC ऑपरेटरकडून ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली जाते. नोंदणी झाल्यानंतर शेतकऱ्याला पेन्शन अकाउंट नंबर आणि किसान कार्ड दिले जाते.
शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या जीवनसाथीला नियमानुसार 50 टक्के कौटुंबिक पेन्शन, म्हणजेच ₹1,500 मासिक पेन्शन मिळू शकते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.