वाराणसी-पुणे आणि अयोध्या-मुंबईला थेट जोडणी; PM मोदींनी दिली नव्या ट्रेनची भेट

आदित्य कदम
2 Min Read

उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र यांच्यातील रेल्वे संपर्क अधिक मजबूत करण्यासाठी मोठं पाऊल उचलण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी दोन नव्या अमृत भारत एक्स्प्रेस गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला. यामध्ये वाराणसी ते पुणे (हडपसर) आणि अयोध्या ते मुंबई (लोकमान्य टिळक टर्मिनस) या दोन मार्गांचा समावेश आहे.

या नव्या रेल्वे सेवेमुळे दोन्ही राज्यांमधील प्रवास अधिक सोपा होणार आहे. विशेषतः रोजचे प्रवासी, स्थलांतरित कामगार आणि भाविकांना याचा मोठा फायदा होण्याची अपेक्षा आहे. थेट रेल्वे सेवा उपलब्ध झाल्यामुळे प्रवासात ट्रेन बदलण्याची गरज कमी होणार आहे.

वाराणसी आणि अयोध्या ही उत्तर प्रदेशातील महत्त्वाची धार्मिक स्थळे आहेत. दरवर्षी लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात. आता पुणे आणि मुंबईसारख्या मोठ्या शहरांशी थेट रेल्वे जोडणी झाल्याने धार्मिक पर्यटनालाही चालना मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

वाराणसीहून सुटणारी अमृत भारत एक्स्प्रेस प्रयागराज, झाशी, भोपाळ, मनमाड आणि कोपरगावसारख्या महत्त्वाच्या स्थानकांवर थांबणार आहे. त्यानंतर ही गाडी पुण्यातील हडपसर येथे पोहोचेल. हा संपूर्ण प्रवास साधारण 30 तासांत पूर्ण होणार आहे.

तर अयोध्या ते मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस ही अमृत भारत एक्स्प्रेस सुलतानपूर, प्रयागराज, सतना, जबलपूर, इटारसी, भुसावळ, जळगाव, नाशिक रोड, कल्याण आणि ठाणे मार्गे धावणार आहे. या गाडीचा प्रवास सुमारे 28 तासांचा असेल.

रेल्वे मंत्रालयाच्या माहितीनुसार, अमृत भारत ट्रेन सामान्य प्रवाशांना लक्षात घेऊन तयार करण्यात आली आहे. कमी खर्चात अधिक आरामदायी आणि सोयीस्कर प्रवास देण्याचा यामागचा उद्देश आहे.

या दोन्ही गाड्यांच्या उद्घाटनानंतर नियमित वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाणार आहे. तसेच या गाड्यांचे भाडे नियमित मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांच्या तुलनेत थोडे अधिक, म्हणजे साधारण 15 ते 17 टक्के जास्त असणार आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Related Posts

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *