सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पवनार ते पत्रादेवी दरम्यान प्रस्तावित असलेल्या शक्तीपीठ महामार्गाचा नवा आराखडा आता निश्चित करण्यात आला आहे. या मार्गाला ‘शक्तीपीठ द्रुतगती महामार्ग’ असे नाव देण्यात आले असून त्याला राज्य महामार्ग १० चा दर्जा मिळाला आहे.
या सुधारित आराखड्यानुसार हा महामार्ग सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यातील एकूण १४ गावांतून जाणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील इसापूर येथून हा मार्ग सिंधुदुर्गमध्ये प्रवेश करेल.
दोडामार्ग तालुक्यात कुंभवडे, फुकेरी आणि झोळंबे या तीन गावांचा समावेश आहे. तर सावंतवाडी तालुक्यात केगद, उडेली, नेने, फणसवडे, घाराप, दाभिळ, असनिये, पडवे माजगाव, पडवे, डेगवे आणि बांदा या गावांतून हा मार्ग जाणार आहे. या भागांमध्ये लवकरच जमीन सर्वेक्षणाची प्रक्रिया सुरू होणार आहे.
नव्या आराखड्यात पर्यावरणाचा विचार करून काही बदल करण्यात आले आहेत. विशेषतः आंबोली घाट क्षेत्र आणि आसपासची संवेदनशील गावे या मार्गातून वगळण्यात आली आहेत. त्यामुळे मार्ग आता चंदगड-इसापूरमार्गे थेट कुंभवडे येथे जोडला जाणार आहे.
दरम्यान, या महामार्गाच्या जोडणीवरून राजकीय चर्चा सुरू झाली आहे. सध्या हा मार्ग बांदा येथे मुंबई-गोवा महामार्गाला जोडण्याचा प्रस्ताव आहे. मात्र, काही लोकप्रतिनिधींनी तो रेडी बंदर आणि कोस्टल हायवेपर्यंत नेण्याची मागणी केली आहे.
माजी मंत्री दीपक केसरकर यांनी या संदर्भात राज्य सरकारकडे वारंवार पाठपुरावा केला आहे. त्यांच्या मते, अशी जोडणी झाल्यास व्यापार आणि पर्यटनाला मोठी चालना मिळू शकते. मात्र, सध्याच्या आराखड्यात या प्रस्तावाला अद्याप प्राधान्य मिळालेले नाही.
हा महामार्ग नागपूर ते गोवा जोडणार असल्याने राज्यातील दळणवळण अधिक वेगवान होण्याची अपेक्षा आहे. विशेषतः सिंधुदुर्गातील बांदा- पत्रादेवी भागाचे महत्त्व वाढणार असल्याचे मानले जात आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.