Cockroach Janta Party: देशभरात सध्या ‘कॉकरोच जनता पार्टी’ या नावाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. सुरुवातीला अनेकांनी हा प्रकार केवळ मजेशीर असल्याचं मानलं. मात्र काही दिवसांतच हा विषय सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागला आणि मोठ्या प्रमाणात लोकांचं लक्ष वेधून घेतलं.
१५ मे रोजी सुरू झालेल्या या डिजिटल मोहिमेने अल्पावधीतच प्रचंड लोकप्रियता मिळवल्याचा दावा केला जात आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या पेजला काही दिवसांतच मोठ्या प्रमाणात फॉलोअर्स मिळाल्यामुळे नेटिझन्समध्ये याबद्दल उत्सुकता वाढली आहे.
या मोहिमेने प्रसिद्ध युट्युबर ध्रुव राठी यालाही फॉलोअर्सच्या बाबतीत मागे टाकल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. फक्त काही दिवसांत लाखो सबस्क्रायबर्स आणि फॉलोअर्स मिळाल्यामुळे ही मोहीम चर्चेचा विषय ठरली आहे.
‘कॉकरोच जनता पार्टी’मागील नाव म्हणजे छत्रपती संभाजीनगरमधील अभिजीत दीपके. ते मूळचे वाळूज परिसरातील रहिवासी आहेत. सध्या ते अमेरिकेतील बोस्टन विद्यापीठात जनसंपर्क विषयात शिक्षण घेत आहेत.
३० वर्षीय अभिजीत यांनी पुण्यातून ब्रॉडकास्ट जर्नलिझमचं शिक्षण पूर्ण केलं आहे. ते पॉलिटिकल कम्युनिकेशन आणि डिजिटल कॅम्पेनिंग क्षेत्रातही काम करत आहेत. सोशल मीडिया आणि राजकीय संवाद यावर त्यांचा अभ्यास असल्याचं सांगितलं जात आहे.
अभिजीत दीपके यांनी यापूर्वी आम आदमी पार्टीच्या सोशल मीडिया टीमसोबत स्वयंसेवक म्हणूनही काम केलं होतं. दिल्ली विधानसभा निवडणुकीदरम्यान मीम्सआधारित डिजिटल मोहिमांमध्ये त्यांचा सहभाग होता.
दरम्यान, सोशल मीडियावर ‘कॉकरोच जनता पार्टी’बाबत विविध प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. काही जण याकडे डिजिटल आंदोलन म्हणून पाहत आहेत, तर काहींनी यावर विनोदी मीम्स आणि पोस्ट्स शेअर केल्या आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.