PMMVY Scheme: केंद्र सरकारकडून गरोदर महिला आणि स्तनदा मातांच्या आरोग्याला आधार देण्यासाठी प्रधानमंत्री मातृ वंदना योजना (PMMVY) राबवली जात आहे. ‘मिशन शक्ती’ अंतर्गत चालणाऱ्या या योजनेत पात्र महिलांना पहिल्या आणि दुसऱ्या अपत्यासाठी मिळून 11,000 रुपयांपर्यंत आर्थिक मदत दिली जाते.
ही योजना मातांचे आरोग्य सुधारण्यासाठी, बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि गरोदरपणाच्या काळात महिलांना आर्थिक सहाय्य मिळावे या उद्देशाने सुरू करण्यात आली आहे. योजनेची रक्कम डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT) माध्यमातून थेट लाभार्थींच्या बँक खात्यात जमा केली जाते.
पहिल्या अपत्यासाठी महिलांना एकूण 5,000 रुपयांची मदत मिळते. यामध्ये गरोदरपणाची नोंदणी झाल्यानंतर पहिल्या टप्प्यात 3,000 रुपये दिले जातात. बाळाच्या जन्मानंतर दुसऱ्या टप्प्यात 2,000 रुपये जमा केले जातात.
दुसरे अपत्य मुलगी असल्यास केंद्र सरकारकडून अतिरिक्त 6,000 रुपयांची मदत दिली जाते. त्यामुळे पात्र महिलांना एकूण ₹11,000 पर्यंतचा लाभ मिळू शकतो.
योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी निश्चित करण्यात आल्या आहेत. अर्जदार महिलेचे वय किमान 19 वर्षे असावे. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. तसेच मनरेगा जॉब कार्ड, ई-श्रम कार्ड, बीपीएल कार्ड किंवा पीएम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांनाही या योजनेत प्राधान्य दिले जाते.
बाळाच्या जन्मानंतर 270 दिवसांच्या आत अर्ज करणे आवश्यक आहे. मुदत संपल्यानंतर अर्ज स्वीकारला जात नाही.
अर्ज प्रक्रिया देखील सोपी ठेवण्यात आली आहे. महिला अधिकृत पोर्टलवर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. तसेच जवळच्या अंगणवाडी केंद्रात किंवा सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन ऑफलाइन अर्जही सादर करता येतो.
अर्जासाठी आधार कार्ड, बँक पासबुक, रेशन कार्ड किंवा उत्पन्नाचा दाखला आणि एमसीपी (MCP) कार्ड आवश्यक असते. सर्व कागदपत्रे योग्यरित्या सादर केल्यानंतर अर्जाची पडताळणी केली जाते.
सरकारी आकडेवारीनुसार, देशभरातील 4 कोटींहून अधिक महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. यासाठी आतापर्यंत 19 हजार कोटी रुपयांहून अधिक निधी वितरित करण्यात आला आहे.
योजनेबाबत अधिक माहिती हवी असल्यास महिलांनी जवळच्या अंगणवाडी सेविका किंवा आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.