डोंबिवलीत फेरीवाल्यांच्या कारवाईदरम्यान झालेल्या हल्ल्यानंतर KDMC प्रशासनाने कडक भूमिका घेतली आहे. अधिकाऱ्यावर झालेल्या हल्ल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मोठी कारवाई करण्यात आली.
Kalyan-Dombivli Municipal Corporation (KDMC) चं पथक शुक्रवारी घरडा सर्कल ते पेंढरकर कॉलेज परिसरात फेरीवाल्यांवर कारवाईसाठी गेलं होतं. यावेळी एका फेरीवाल्याने तीव्र विरोध करत अधिकाऱ्यावर बांबूने हल्ला केला.
या हल्ल्यात अधिकारी सुरेश कामराज जखमी झाले. परिस्थिती बिघडल्यामुळे त्या दिवशी पथकाला कारवाई थांबवून माघारी फिरावं लागलं.
या घटनेनंतर प्रशासनाने दुसऱ्याच दिवशी मोठं पाऊल उचललं. महापालिकेचे उपायुक्त प्रसाद बोरकर यांच्या नेतृत्वाखाली मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आणि शनिवारी पुन्हा कारवाई सुरू करण्यात आली.
आज पथकाने घरडा सर्कल ते पेंढरकर कॉलेज परिसरात धडक मोहीम राबवली. या वेळी जवळपास 40 टपऱ्यांवर कारवाई करण्यात आली. काही फेरीवाल्यांनी पुन्हा विरोध करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो निष्फळ ठरला.
या भागात फेरीवाल्यांमुळे रस्ते अडवले जात असल्याने वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत असल्याची तक्रार होती. त्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचं प्रशासनाचं म्हणणं आहे.
दरम्यान, काही फेरीवाल्यांनी महापालिकेच्या पथकावर पैसे उकळण्याचे आरोप केले. मात्र प्रशासनाने हे आरोप फेटाळले आहेत.
या घटनेनंतर परिसरात तणावाचं वातावरण आहे. पुढील काही दिवस प्रशासन या भागावर लक्ष ठेवणार असल्याचं सांगितलं जात आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.