Maharashtra Weather Today: राज्यातील आजचे हवामान पुन्हा एकदा बदलले असून, काही भागांत पावसाचा जोर कमी झाला असला तरी अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील 24 तासांत राज्यातील अनेक भागांत विजांच्या कडकडाटासह हलका ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
दक्षिण कोकण आणि गोव्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमाथा परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याने यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
कोकण विभागात ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर पालघर जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
उत्तर महाराष्ट्रात धुळे आणि नंदुरबार येथे हलक्या पावसाची शक्यता आहे. जळगाव, नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना आणि विजांसह हलका पाऊस पडू शकतो. मात्र नाशिक घाटमाथा परिसरात पावसाचा जोर तुलनेने अधिक राहण्याचा अंदाज आहे.
पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूरच्या मैदानी भागांत हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे. मात्र घाटमाथा परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज असल्याने नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड येथे हलका पाऊस पडू शकतो. तर परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरींची शक्यता आहे.
विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यांमध्ये विशेष इशारा देण्यात आलेला नाही. मात्र यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला असून, येथे हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, उद्याही विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट कायम राहणार आहे. नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड आणि हिंगोली येथेही हलक्या सरींची शक्यता आहे. त्यानंतर पुढील दोन दिवसांत राज्यातील बहुतांश भागांत पावसाचा जोर हळूहळू कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.