महाराष्ट्रात १ मेपासून रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय जाहीर झाल्यानंतर त्यावरून राज्यात चर्चा रंगली आहे. या निर्णयाला काही चालक संघटनांनी विरोध दर्शवत आंदोलनाचा इशारा दिला आहे. अशातच शिव ठाकरे याने आपल्या खास कृतीतून या मुद्द्यावर भूमिका स्पष्ट केली आहे.
‘बिग बॉस मराठी’मुळे घराघरात पोहोचलेल्या शिव ठाकरेने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत मराठी भाषा सक्तीच्या निर्णयाला पाठिंबा दिला. इतकंच नाही, तर आंदोलनाच्या दिवशी प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून त्याने स्वतःची TATA हॅरिअर सेवा म्हणून उपलब्ध करून देण्याची घोषणा केली आहे.
शिवने पोस्टमध्ये लिहिलं की, ४ मे रोजी टॅक्सी चालकांचा संप असला तरी प्रवाशांनी काळजी करू नये. रस्त्यावर त्याची गाडी दिसल्यास हक्काने थांबवावी आणि सेवा घ्यावी. गाडीच्या मागे ‘जय महाराष्ट्र’ अशी खूण असेल आणि चालकाच्या सीटवर भगवा फेटा घातलेला व्यक्ती दिसेल, असंही त्याने नमूद केलं. त्याच्या पोस्टमधील “मराठी माणूस थांबता कामा नये” हा संदेश विशेष चर्चेत आला आहे.
ही पोस्ट समोर आल्यानंतर सोशल मीडियावर शिववर कौतुकाचा वर्षाव होत आहे. अनेकांनी त्याच्या या पुढाकाराचं स्वागत करत मराठीसाठी घेतलेल्या भूमिकेचं अभिनंदन केलं आहे.
दरम्यान, या निर्णयाला मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी पाठिंबा दिला आहे. अभिनेता रितेश देशमुख यानेही महाराष्ट्रात मराठी भाषा अनिवार्य असणं ही काळाची गरज असल्याचं म्हटलं आहे. इतर राज्यांत गेल्यावर आपण स्थानिक भाषेचा आदर करतो, मग महाराष्ट्रात मराठीचा आग्रह का नसावा, असा सवालही त्याने उपस्थित केला.
दिग्दर्शक आणि अभिनेता हेमंत ढोमे यांनीही या मुद्द्यावर स्पष्ट भूमिका घेतली आहे. महाराष्ट्रात राहून स्थानिक भाषेचा आदर करणं गरजेचं असल्याचं त्यांनी ठामपणे सांगितलं. अभिनेता अंशुमन विचारे यानेही सोशल मीडियावर पोस्ट करत मराठीला प्राधान्य देण्याची भूमिका मांडली.
एकूणच, मराठी भाषा सक्तीच्या निर्णयावरून सुरू असलेल्या वादात आता कलाकारही उघडपणे मत व्यक्त करताना दिसत आहेत. शिव ठाकरेच्या कृतीमुळे मात्र या चर्चेला वेगळं वळण मिळालं आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.