छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यातील १ लाख ८० हजार १७६ शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरले असून त्यांच्या एकूण १६३२ कोटी १२ लाख रुपयांच्या कर्जाची माफी होणार आहे.
जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक प्रेषित मोघे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीयकृत आणि सहकारी बँकांमधून कर्ज घेतलेल्या पात्र शेतकऱ्यांची आकडेवारी पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. मात्र अजूनही ७१२ शेतकऱ्यांचे आधार संलग्नीकरण पूर्ण झालेले नाही.
या शेतकऱ्यांनी तातडीने संबंधित बँकेत जाऊन आधार लिंकिंगची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. आधार लिंकिंग बाकी असलेल्या खातेदारांमध्ये बँक ऑफ बडोदाचे सर्वाधिक ४८४ खातेधारक आहेत. त्याशिवाय बँक ऑफ महाराष्ट्रचे १६२, स्टेट बँक ऑफ इंडियाचे ४०, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे १२, युनियन बँकेचे ६ आणि इतर काही बँकांमधील खातेधारकांचा समावेश आहे.
मोघे यांनी सांगितले की, पुढील आधार संलग्नीकरण आणि इतर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पात्र शेतकऱ्यांची संख्या आणखी वाढू शकते.
योजनेत दोन लाख रुपयांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांनाही लाभ मिळणार आहे. अशा शेतकऱ्यांनी अतिरिक्त रक्कम संबंधित बँकेत जमा केल्यानंतर शासनाकडून दोन लाख रुपयांपर्यंतची मदत ओटीएस अंतर्गत दिली जाईल.
ज्या शेतकऱ्यांनी २०१९ मधील महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेतला आहे, त्यांना या नव्या योजनेत जास्तीत जास्त ५० हजार रुपयांपर्यंतच कर्जमाफी मिळणार आहे. त्यासाठीही अतिरिक्त थकबाकी आधी भरावी लागणार आहे.
शेतकऱ्यांना त्यांचा हिस्सा भरण्यासाठी ३१ मार्च २०२७ पर्यंत मुदत देण्यात आली आहे.
या योजनेचा लाभ १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ दरम्यान अल्पमुदत पीक कर्ज घेतलेल्या आणि ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत असलेल्या तसेच ३१ मार्च २०२६ पर्यंत कर्जफेड न केलेल्या शेतकऱ्यांना मिळणार आहे. एका किंवा अनेक बँकांमधील पात्र कर्जखात्यांवरील मुद्दल व व्याजासह एकूण थकबाकीपैकी कमाल दोन लाख रुपयांपर्यंतची रक्कम माफ केली जाणार आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.