महाराष्ट्रात वाढत्या उकाड्याचा फटका आता गंभीर स्वरूपात जाणवू लागला आहे. उष्माघाताने आणखी एका तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना लातूर जिल्ह्यात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, वाढत्या तापमानाबाबत चिंता वाढली आहे.
लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील एरंडी गावातील 25 वर्षीय महेश इंगोले यांचा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महेश दुपारच्या वेळी शेतातील काम आटोपून घरी परतला होता.
घरी आल्यानंतर अंगणात हात-पाय धुवून तो घरात गेला. त्यानंतर अचानक त्याला चक्कर आली आणि तो खाली कोसळला. कुटुंबीयांनी त्याला तातडीने उपचारासाठी नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याआधीच त्याचा मृत्यू झाला.
सध्या लातूरमध्ये तापमानाचा पारा 41 ते 42 अंश सेल्सियसदरम्यान पोहोचला आहे. तर कर्नाटक सीमेलगतच्या औराद शहाजनी परिसरात तब्बल 43.3 अंश तापमानाची नोंद झाली आहे. त्यामुळे मराठवाड्यात उष्णतेची तीव्रता आणखी वाढल्याचे चित्र आहे.
विशेष म्हणजे, गेल्या एका महिन्यात उष्माघातामुळे जिल्ह्यात झालेला हा दुसरा मृत्यू असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे नागरिकांनी दुपारच्या कडक उन्हात बाहेर पडताना काळजी घेण्याची गरज अधिक वाढली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.