राज्यातील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. गेल्या काही दिवसांत अनेक लाभार्थी महिलांच्या खात्यात मार्च आणि एप्रिल महिन्यांचे मिळून 3000 रुपये जमा झाले आहेत. मात्र e-KYC पूर्ण न झाल्यामुळे आणि काही तांत्रिक अडचणींमुळे अनेक महिलांना योजनेचा लाभ मिळालेला नाही.
याच पार्श्वभूमीवर राज्यभरातील महिलांकडून e-KYC प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याची मागणी होत होती. आता याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे.
लातूर जिल्ह्यातील राजूर येथे आयोजित सभेत बोलताना शिंदे यांनी सांगितलं की, ज्या महिलांचे e-KYC अद्याप पूर्ण झालेले नाही, त्यांनाही पुन्हा संधी दिली जाणार आहे. “एकही पात्र महिला योजनेपासून वंचित राहणार नाही,” असं त्यांनी स्पष्ट केलं.
तसेच e-KYC प्रक्रियेदरम्यान आलेल्या तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी प्रशासनाला आवश्यक सूचना देण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. त्यामुळे पात्र महिलांना लवकरात लवकर लाभ मिळावा, यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचं त्यांनी नमूद केलं.
याआधीही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी e-KYC प्रक्रिया सुरूच राहील, असं संकेत दिले होते. आता त्यांच्या नव्या घोषणेमुळे अनेक महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, या घोषणेनंतर लाभार्थी महिलांमध्ये आनंदाचं वातावरण असून, ज्यांचा लाभ थांबला होता त्यांना पुन्हा योजनेचा फायदा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.