Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी आणि e-KYC प्रक्रियेनंतर राज्यातील सुमारे 80 लाख जण अपात्र ठरल्याची माहिती समोर आली आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना फडणवीस म्हणाले की, योजना सुरू करताना सरकारने उत्पन्न, वय, शासकीय नोकरी आणि चारचाकी वाहन यांसारखे काही निकष निश्चित केले होते. त्यानुसार पात्र महिलांना लाभ देण्यात आला होता. मात्र नंतर करण्यात आलेल्या पडताळणीत अनेक अनियमितता आढळून आल्या.
सरकारने विविध विभागांकडून माहिती घेतल्यानंतर काही लाभार्थ्यांकडे चारचाकी वाहने असल्याचे समोर आले. तसेच काही जणांचे वार्षिक उत्पन्न निश्चित मर्यादेपेक्षा जास्त असल्याचेही आढळले. याशिवाय अनेक लाभार्थ्यांनी e-KYC प्रक्रिया पूर्ण केली नसल्याचेही निदर्शनास आले.
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, पडताळणीदरम्यान तब्बल 14 हजार पुरुष या योजनेचा लाभ घेत असल्याचे उघड झाले आहे. अशा प्रकरणांमध्ये फसवणूक झाल्याचे स्पष्ट असून, संबंधितांकडून योजनेअंतर्गत मिळालेली संपूर्ण रक्कम वसूल करण्यात येणार आहे.
त्यांनी स्पष्ट केले की, पात्र असलेल्या सुमारे 1 कोटी 70 लाख महिलांना योजनेचा लाभ यापुढेही नियमितपणे मिळत राहील. मात्र ज्या लाभार्थ्यांनी KYC पूर्ण केले नाही किंवा निकष पूर्ण केले नाहीत, त्यांना लाभ मिळणार नाही.
फडणवीस यांनी आणखी एक महत्त्वाची घोषणा करत सांगितले की, काही महिलांना आपण पात्र असूनही लाभ मिळत नसल्याची भावना असेल, तर सरकार पुन्हा एकदा KYC साठी विंडो सुरू करण्यास तयार आहे. यामुळे पात्र महिलांना त्यांची कागदपत्रे अद्ययावत करण्याची संधी मिळू शकते.
दरम्यान, सरकारने स्पष्ट केले आहे की, निकष पूर्ण करणाऱ्या कोणत्याही महिलेला योजनेतून वगळलेले नाही. मात्र पडताळणीत अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना पुढे या योजनेचा लाभ मिळणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.