लाडकी बहिणींसाठी आनंदाची बातमी? २१०० रुपयांबाबत महत्त्वाची अपडेट समोर

आदित्य कदम
2 Min Read

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. विधानसभा निवडणुकीदरम्यान महायुती सरकारने या योजनेतील मासिक आर्थिक मदत १,५०० रुपयांवरून २,१०० रुपये करण्याचे आश्वासन दिले होते. आता याच संदर्भात एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे.

पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेने (EAC-PM) सादर केलेल्या एका शोधनिबंधात महागाई आणि वाढत्या घरगुती खर्चाचा विचार करून गरज भासल्यास महिलांना दिली जाणारी आर्थिक मदत वाढवण्याची शिफारस करण्यात आली आहे. मात्र, या अहवालात २,१०० रुपये देण्याचा कोणताही निर्णय जाहीर करण्यात आलेला नाही.

या अहवालात महाराष्ट्रातील माझी लाडकी बहीण योजना आणि ओडिशातील सुभद्रा योजनेचा अभ्यास करण्यात आला आहे. या दोन्ही योजनांमुळे महिलांना आर्थिक आधार मिळाल्याचे तसेच त्यांच्या बचतीत वाढ झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.

अहवालानुसार, लाडकी बहीण योजना सुरू झाल्यानंतर महाराष्ट्रातील महिलांच्या बँक खात्यातील शिल्लक ८४ टक्क्यांनी वाढल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच महिलांच्या मासिक खर्चातही सुमारे ४६ टक्क्यांनी वाढ झाल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. हा खर्च प्रामुख्याने आरोग्य, शिक्षण आणि दैनंदिन गरजांसाठी होत असल्याचे सांगण्यात आले आहे.

याशिवाय या योजनेमुळे महिलांसह त्यांच्या कुटुंबांनाही आर्थिक फायदा झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. घरगुती बचतीत वाढ झाली असून आर्थिक व्यवस्थापन अधिक सक्षम झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

दरम्यान, राज्य सरकारने योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी सुरू ठेवली आहे. केवायसी प्रक्रिया पूर्ण न करणे किंवा चुकीची माहिती भरणे यामुळे अनेक महिलांना अडचणींचा सामना करावा लागला आहे. याच पार्श्वभूमीवर सुमारे ८० लाख महिला अपात्र ठरल्याची माहिती समोर आली आहे.

सध्या १,५०० रुपयांऐवजी २,१०० रुपये देण्याबाबत राज्य सरकारकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे लाभार्थींनी सोशल मीडियावरील चर्चांवर विश्वास न ठेवता सरकारच्या अधिकृत घोषणेची प्रतीक्षा करावी.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Related Posts

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *